

नाशिक : शिवरायांच्या पुतळ्यासमोर अर्वाच्च भाषेत शिविगाळ करणे अतिशय वेदनादायी आहे, असे नमूद करत भुजबळांचा बॅनर फाडून टाकला. पण सोबत शिवाजी महाराजांचेही चित्र होते हे त्यांच्या लक्षात आले नाही. काही लोक निवडणुकीसाठी इच्छुक आहेत म्हणून त्यांनी हा पराक्रम केला, असा आरोप राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
मनोज जरांगे यांनी येवल्यात येऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. त्यांच्याबद्दल तक्रार नाही. मात्र, त्यानंतर शिवीगाळीचा प्रकार घडला. महाराजांच्या वास्तूवर लाथा मारल्या गेल्या हे योग्य नाही, असेही भुजबळ यांनी सांगितले. येवल्यात मराठा आंदोलक आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. रविवारी मनोज जरांगे पाटील येवल्यात शिवसृष्टीला भेट देण्यासाठी आले. त्यावेळी मराठा आंदोलक आणि भुजबळांचे समर्थक आमनेसामने आले. भुजबळ समर्थनार्थ व मराठा आंदोलक यांच्यात वादावादी झाली. यानंतर भुजबळ सोमवारी तडकाफडकी येवल्यात दाखल झाले. राड्याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली. भुजबळ म्हणाले की, मी काल बाबा सिद्दिकींच्या दफनविधीच्या कार्यक्रमात होतो. तेव्हा मला समजले. छत्रपती शिवरायांच्या समोर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे हे अतिशय वेदनादायी आहे. जरांगे येणार होते, येवल्यातील मुक्तिभूमीला अभिवादन करणार होते आणि सभाही घेणार होते. त्यानंतर त्यांनी शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतले. त्याच्याबद्दल तक्रार नाही. मात्र, त्यानंतर स्थानिक लोकांनी शिवीगाळ केली. उद्घाटन झाल्यावर तिथे सात-आठ लोक माहिती देण्यासाठी असतात. लक्ष ठेवून असतात. जरांगे यांच्या लोकांनी शिवीगाळ केली, असे त्यांनी या लोकांना सांगितले. आपले लोक आतमध्ये होते, पोलिस नंतर आले. दरवाजावर लाथा मारायला लागले. महाराजांच्या वास्तूवर लाथा मारणे योग्य नाही, असे भुजबळ यांनी सांगितले.
येवल्यातील जनता आणि महाराष्ट्रातील जनता याबाबत विचार करेल. लाथा मारल्या, नंतर महाराजांचेही फोटो फाडले. माझेही सोबत फोटो होते. काही लोकांना समज नाही. माझे कार्यकर्ते शिवीगाळ कशाला करतील. शिवकालीन शस्त्रासाठी देखभाल आणि माहिती देण्यासाठी आमचे लोक तिथे स्वयंसेवक म्हणून काम करतात, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.