

नाशिक : नाताळ आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जगभरात उत्साह आहे. राज्यातही नाताळ आणि थर्टी फर्स्टच्या पार्टीचे नियोजन नागरिक करीत आहेत. राज्य सरकारने तळीरामांनाही 'चियर्स' करीत पहाटे पाचपर्यंत मद्यविक्री-सेवनाची परवानगी दिली आहे. त्यामुळे बिअर-वाइन दुकानातून मध्यरात्री १ पर्यंत मद्यविक्री होणार आहे. तर हॉटेल, बारमध्ये पहाटे पाचपर्यंत मद्यविक्री होणार आहे.
२०२४ वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने अनेकांनी सहकुटुंब, मित्रपरिवारासह वर्षअखेरीस सुट्यांचे नियोजन केले आहे. तर काहींनी थर्टी फर्स्ट साजरी करण्यासाठी पार्टींचे नियोजन केले आहे. तसेच नाताळनिमित्तही अनेकांनी जल्लोषाचे नियोजन केले आहे. या कालावधीत मद्यपींकडून मद्याची सर्वाधिक मागणी असल्याने राज्य सरकारने राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेत मद्यविक्रीस तीन दिवस पहाटेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार २४, २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर रोजी मद्यपींना बिअर-वाइन शॉपमधून मध्यरात्री एकपर्यंत मद्य खरेदी करता येणार आहे. तर हॉटेल, बारमध्ये पहाटे पाचपर्यंत बसून मद्य रिचवता येणार आहे. गृहविभागाने याबाबत आदेश काढला आहे.
मद्यविक्रीस तीन दिवस वाढीव मुदत दिली आहे. मद्यपींनी एकदिवसीय मद्यसेवन परवाना घेऊनच मद्य खरेदी व सेवन करावे. तसेच विक्रेत्यांनीही परवानाधारकांनाच मद्यविक्री करावी. नागरिकांनी अवैध मद्यविक्रीबाबत तक्रार करावी.
- अमृत तांबारे, उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग