

मनमाड (नाशिक) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये (एप्रिल व मे २०२५) डिजिटल व्यवहारांच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती साधली आहे. विशेषतः पार्सल सेवेमध्ये डिजिटल पेमेंट्सना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले गेले असून, एकूण महसुलापैकी ९४.७६ टक्के रक्कम ही डिजिटल माध्यमातून जमा करण्यात आली आहे.
यामध्ये सर्वाधिक ६९ टक्के रक्कम पॉईंट ऑफ सेल (पीओएस) मशीनच्या माध्यमातून संकलित करण्यात आली आहे. त्यानंतर डिमांड ड्राफ्ट/व्हाउचरच्या माध्यमातून १८ टक्के आणि क्यूआर कोडवर आधारित पेमेंट्सद्वारे आठ टक्के रक्कम जमा करण्यात आली. ही आकडेवारी भुसावळ विभागाच्या "डिजिटल इंडिया" आणि "कॅशलेस इकॉनॉमी" या केंद्र सरकारच्या दूरदृष्टीचा सक्रिय पाठपुरावा करत असल्याचे स्पष्ट उदाहरण आहे. डिजिटल व्यवहार अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक करण्यासाठी विभागाने विविध तांत्रिक उपाययोजना केल्या आहेत.
प्रवासी आणि व्यावसायिक ग्राहकांना डिजिटल व्यवहारांबाबत जागरूक करण्यासाठी पीओएस मशीन, क्यूआर कोड वापराची माहिती दिली जात आहे. यासोबतच कर्मचारी प्रशिक्षण आणि कॅशलेस व्यवहारांसाठी प्रोत्साहनपर मोहिमा राबविण्यात येत आहेत. भविष्यात डिजिटल व्यवहारांचे प्रमाण आणखी वाढवण्यासाठी भुसावळ रेल्वे विभाग कटिबद्ध असून नागरिकांना अधिक चांगली, सुरक्षित व जलद सेवा देण्याचा सातत्याने प्रयत्न केला जाणार आहे.