नाशिक : राज्यात १९९९ मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यानंतरच जातीजातींमध्ये द्वेष निर्माण करण्यास सुरुवात झाली. मराठा, ब्राह्मण, माळी हा वाद पुढे आला. महापुरुष जातीत वाटले गेले. आता 'मराठा-ओबीसी' वाद पेटविला आहे. लोकांना जातींमध्ये गुंतून ठेवण्याचे राजकारण शरद पवार यांनीच सुरू केल्याचा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.
नाशिक पश्चिम मतदारसंघाचे मनसे उमेदवार दिनकर पाटील यांच्या प्रचारार्थ सातपूर येथे आयोजित सभेत ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, 'अठरापगड जातींना सोबत घेऊन शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. महात्मा जोतिबा फुलेंनी शिक्षणाची ज्याेत माळी समाजासाठी नव्हे तर सर्वांसाठी पेटवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा संदेश दिला. लोकमान्य टिळकांनी 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' हा नारा ब्राह्मणांसाठी नव्हे तर इंग्रजांविरुद्ध दिला. असे असतानाही, महापुरुषांना जातींमध्ये विभागून राजकारण केले जात आहे. २०१९ मध्ये जनतेनी ज्या पक्षांना सत्तेत बसण्याचा कौल दिला, त्यांनी केवळ खुर्चीसाठी राजकारण गलिच्छ केल्याचे सांगत राज यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आपल्याशिवाय सत्तेचे समीकरण बसू शकत नाही, ही बाब लक्षात येताच उद्धव यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा विषय रेटला. त्यांच्या जागी मी असतो तर खुर्चीचा मोह धरला नसता. मात्र, मी सांगेल त्या गोष्टी महाराष्ट्रात झाल्या पाहिजे हा हट्ट धरला असता. राज्याच्या राजकारणात ज्या गलिच्छ गोष्टी घडल्या, त्या मतदारांना गृहित धरून घडल्या आहेत. जर फुटणाऱ्यांनाच मत द्यायचे होते, तर पराभूत झालेले काय वाईट होते, असा सवाल करीत राज यांनी यावेळी राज्याची सत्ता माझ्या हातात द्या, अशी सादही उपस्थितांना घातली. दरम्यान, यावेळी सिडको, पवननगर स्टेडियम येथे पार पडलेल्या सभेतही त्यांनी राज्यातील स्थितीवर परखड भाष्य केले. व्यासपीठावर दिनकर पाटील यांच्यासह शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, डॉ. प्रदीप पवार, सलीम शेख, अविनाश अभ्यंकर आदी उपस्थित होते.
शिवाजी पार्क येथे जेव्हा सभा झाली तेव्हा मी पंतप्रधानांना पाच गोष्टी सांगितल्या होत्या. मराठीसारख्या समृद्ध भाषेला अभिजात दर्जा द्यावा, हे मी त्यांना सांगितले होते. त्यांनी मराठीला अभिजात दर्जा दिला, त्यासाठी त्यांचे आभार मानतो. मराठी भाषेसारखी श्रीमंती देशाच्या कोणत्याही राज्यात नाही, या भाषेला पंतप्रधानांनी अभिजात दर्जा दिल्याने, त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच असल्याचेही राज ठाकरे म्हणाले.
नाशिक महापालिकेत मनसेची पाचच वर्षे सत्ता होती. या काळात नाशिकचा झालेला विकास महाराष्ट्रातील एकाही शहराचा आतापर्यंत झाला नसल्याचा दावाही राज यांनी केला. नाशिककरांना गंगापूर धरणातील पाणी कमी पडणार होते म्हणून मुकणे धरणातून थेट पाइपलाइन टाकून नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढील ५० वर्षे मार्गी लावला आहे. बॉटनिकल गार्डन, कारंजे यासारखे कामे नाशिकमध्ये केली आहेत. नाशिकचे सुसज्ज रस्तेही त्यावेळी आम्ही केल्याचा दावा ठाकरे यांनी केला.
शहराची दळणवळण व्यवस्था सुसज्ज असेल तर शहराचा विकास होतो. मी सत्तेत असतो तर नाशिक-मुंबई महामार्ग सुसज्ज केला असता. याशिवाय शहरात आयटी पार्क उभारण्याबरोबरच उद्योग विकासाची कामे मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. १९९७-९८ मध्ये महिंद्रा कंपनी जेव्हा आपला विस्तार चेन्नईमध्ये करणार होती, तेव्हा आनंद महिंद्रांची भेट घेऊन ही कंपनी नाशिकमध्येच ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.