

नाशिक : तरुण वर्गास नशेच्या आहारी ढकलण्यासाठी अंमली पदार्थ विक्री करणारे पानटपरी चालकांच्या संपर्कात आल्याचे समोर येत आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) भद्रकाली परिसरातील एका पानटपरीवर छापा टाकत भांगेच्या गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. टपरीचालकासह त्याला या गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी शहरातील एमडी, गांजा, चरस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत त्यांची धरपकड केली आहे. तसेच लाखो रुपयांचा अंमली पदार्थ साठा जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान, संशयित तरुण वर्गाला लक्ष्य करत त्यांना नशेच्या आहारी लावत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, पानटपरीतूनही भांग विक्री होत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. संशयित पानटपरी चालक योगेश संतोष डोईफोडे (२७, रा. गणेशनगर, पंचवटी) हा मंगळवारी (दि. २८) सायंकाळी साडेसहा वाजता भद्रकालीतील शिवशक्ती चौकातील संतोष पानटपरीतून मिक्स गुटख्यासह सीलबंद पाकिटांतून भांगयुक्त गोळ्या विक्री करित होता. ही माहिती एनडीपीएस पथकाचे हवालदार बळवंत कोल्हे यांना मिळाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून कारवाई करत योगेशला ताब्यात घेतले. त्याच्या पानटपरीतून "तुफानी मदन मोदक वटी" नावाच्या सीलबंद पाकिटांमध्ये भांगयुक्त गोळ्या सापडल्या, ज्यांची किंमत ३,३२५ रुपये आहे. या प्रकरणी डोईफोडेसह पुरवठादाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी जप्त केलेल्या भांगेच्या पाकिटावर आढळलेल्या नावानुसार, या गोळ्यांची संकेतस्थळांवरुन ऑनलाईन पद्धतीने विक्री सुरू असल्याचे उघड झाले आहे. याच नावासह आयुर्वेदिक औषधी नावाने ऑर्डर केल्यास १०० गाेळ्या १ हजार ९९ रुपयांत घरपोहोच दिल्या जात असल्याचे समजते. पानटपरीचालक डाेईफाेडेला स्वस्तात भांग आणून देणाऱ्या परप्रांतीय पवनकुमार दुबेविरोधातही गुन्हा दाखल असून पोलिसांनी त्याचा शाेध सुरू केला आहे.