नाशिक : आरतीसह कृतिशील उपक्रमांद्वारे गोदावरी नदीचे प्रदूषण रोखणे अत्यंत आवश्यक आहे. औद्योगिकीकरणामुळे नाल्यांचे सांडपाणी थेट नदीत मिसळले जाते, त्यामुळे नद्यांचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसंख्येच्या वाढीमुळे पाण्याच्या स्रोतांवर प्रचंड ताण येत आहे, आणि जलप्रदूषणामुळे संपूर्ण मानवजातीसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. जल हेच जीवन असल्याने नद्यांचे संरक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांनी केले.
श्री गौतमी गोदावरी जन्मोत्सवानिमित्त रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे गोदाघाटावर शुक्रवारी (दि. 7) गोदावरी महाआरतीसह राज्यपालांच्या हस्ते जल व पर्यावरण तज्ञ पद्मश्री महेश शर्मा यांना व गोदावरी राष्ट्रजीवन पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, उपाध्यक्ष शांताराम भानोसे, नृहसिंहकृपा दास, सचिव मुकूंद खोचे, माजी खासदार भारती पवार, आ. सीमा हिरे, आदींसह हजारो भाविक उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी इंग्रजीतून भाषण केले तर नरसिंह कृपादास प्रभुजी यांनी त्याचे हिंदीत भाषांतर केले.
राज्यपाल राधाकृष्णन् यांनी नाशिकमध्ये गोदाआरती करण्याचे भाग्य लाभल्याचे सांगत सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी गोदा शुद्धीकरण महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. कुंभमेळ्यात गर्दी नियंत्रण, व्यवस्थापन, निवासव्यवस्था व स्वच्छतेसाठी भेदभाव विसरून नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले. नाशिकच्या विकासासाठी नाशिक-शिर्डी रेल्वे सेवा व नाशिक-मुंबई हायवे सहापदरी करण्याच्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली.
पुरस्कारमूर्ती शर्मा यांनी मध्यप्रदेशातील झांबुआ गावातील पाणीटंचाईवर उपाय म्हणून शिवगंगा प्रकल्प सुरू केल्याचे सांगितले. त्यांनी नदी पूजनापेक्षा आधी तिची सेवा करणे महत्त्वाचे असल्याचा संदेश नाशिककरांना दिला. याप्रसंगी रहाटकर आणि गायधनी यांनी मनोगत व्यक्त केले. पद्मश्री महेश शर्मा यांचा याप्रसंगी राष्ट्रजीवन पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
जल, पर्यावरणतज्ज्ञ महेश शर्मा यांनी मध्यप्रदेशातील झाबुआ गावातील भिल्ल समाजाच्या जीवनात १२ वर्षांत आश्चर्यकारक परिवर्तन घडवून आणले. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे झाबुआची ६० टक्के लोकसंख्या गाव सोडून गेली होती. शर्मा यांनी झाबुआमध्ये शिवगंगा प्रकल्प सुरू केला. वाहणार्या गंगेच्या पाण्याची झाबुआ गावात साठवण आणि वृक्षलागवडीद्वारे हरितक्रांती घडवून आणली. वर्षभर पुरेल एवढा स्वच्छ आणि निर्मळ जलसाठा गावात निर्माण केला. १३० हून अधिक तलाव बांधले. 1200 गावांचा विकास केला. 700 हून अधिक गावांचा दुष्काळ संपविला. परिणामी स्थलांतरीत ग्रामीणवासी झाबुआत परतले.
सायंकाळी सव्वा सात वाजता रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे रामघाटावर आरती सुरू असताना पुरोहित संघातर्फे रामकुंड याठिकाणी आरतीपुर्व मंत्रोच्चार सुरू झाले. दोन्ही आरतीसाठी हजारो भाविक रामघाटावर उपस्थित होते. दोन्ही ठिकाणी एकाच वेळी आरती सुरू झाल्याने भाविकांमध्ये आश्चर्याचे आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले. गोदावरीच्या जन्मदिनी भव्य आरत्यांचे आयोजन करण्यात आल्याने गोदाघाटाला दिव्य स्वरुप प्राप्त झाल्याचे दिसून आले.