

सिडको (नाशिक) : गोविंदनगर बोगद्याजवळ गुरुवारी (दि. ३) दुपारी एकच्या सुमारास चारचाकीने अचानक पेट घेतला. काही क्षणातच आगीने वाहनाला वेढले आणि परिसरात धुराचे लोट पसरले. सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले.
कारमधून धूर निघू लागल्याचे निदर्शनास येताच वाहनचालक तत्काळ बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, ही आग इतकी भीषण होती की, काही मिनिटांतच संपूर्ण गाडी जळून खाक झाली. घटनेबाबत सूचना मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. या घटनेमुळे परिसरातील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे किंवा इंधन गळतीमुळे लागली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुढील तपास मुंबई नाका पोलिस करत आहेत.
घटनास्थळी जमलेल्या नागरिकांना अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी अशा घटनांमध्ये त्वरित मदतकार्य कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. वाहनचालकांनी आपल्या वाहनांची वेळोवेळी तपासणी करावी, इंजिन आणि इंधनप्रणाली व्यवस्थित ठेवावी, तसेच वाहनात आग प्रतिबंधक यंत्र (फायर एक्स्टिंग्विशर) असावा, असा सल्ला देण्यात आला.