दिंडोरी : दिंडोरी नाशिक रस्त्यावरील अकराळे फाटा येथे रविवार (दि. 4) रोजी संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान कळवण आगाराची एसटी बस प्रवाशांना घेऊन जात असताना व बोलेरो कार मध्ये समोरासमोर भीषण अपघात होऊन वाहनांनी अचानक पेट घेतला. या भीषण अपघातात बोलेरो कार मधील दोन जणांचा जळून मृत्यू झाला आहे.
नाशिकच्या दिंडोरी परिसरात एसटी बस आणि कारमध्ये भीषण अपघात झाला आहे. दिंडोरीच्या अक्राळे फाट्यावरील ही अपघाताची घटना घडली आहे. अपघातानंतर बस आणि कारने पेट घेतला. या अपघतात कारमधील पाच जणांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तिघांना वाचवण्यात यश आले आहे. एसटी बसमधील सर्व प्रवाशी सुखरूप आहेत. तर जखमींवर जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर कार जळून खाक झाली आहे, तर एसटी बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
बोलेरो कार मध्ये एकूण चार प्रवासी प्रवास करत असून त्यापैकी दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दोघांना स्थानिकांच्या मदतीने नासिक येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तसेच एसटी बसमधील प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीने व प्रत्यक्षदर्शी यांच्या मदतीने बस मधून तत्काळ खाली सुखरुप उतरवण्यात यश आले आहे. या दोघाही वाहनांनी अपघातानंतर पेट घेतला आहे. दरम्यान या भीषण अपघातानंतर कळवण नाशिक रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. भीषण अपघाताची माहिती दिंडोरी पोलिसांना देण्यात आली असून दिंडोरी पोलीस घटनास्थळी रवाना झाले तसेच अग्निशमन दलाला देखील पाचरण करण्यात आले.