

येवला नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकशाहीच्या उत्सवाला अनोखा रंग देत येथील नवरी शुभदा शिंदे यांनी विवाहसोहळ्याच्या काही तास आधीच मतदानाचा हक्क बजावून सर्वांसमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवला.
शनिवारी सकाळी शुभदा शिंदे आणि नवरदेव लग्नाच्या परंपरागत वेशात सजलेल्या गाडीतून मतदान केंद्रावर दाखल झाले. फत्तेबुरुज नाका येथील प्रभाग क्रमांक ८ मधील मतदान केंद्रावर नवरीने मतदान करताच उपस्थित नागरिकांनी तिचे कौतुक केले.
“आज माझा लग्नाचा दिवस असला तरी मी सर्वप्रथम मतदानाला प्राधान्य दिले. सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा,” असे आवाहन नवरी शुभदा शिंदे यांनी केले.
विवाहाच्या तयारीत व्यग्र वातावरण असूनही शुभदाने लोकशाहीबद्दलची जबाबदारी ओळखून घेतलेली ही भूमिका प्रशंसनीय असल्याचे मतस्थानिकांनी व्यक्त केले.