Blood Shortage Nashik | नाशिक शहरील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा
नाशिक : नाशिक शहरातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. दिवाळी आणि निवडणूक पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिरांची घटलेली संख्या तसेच स्वयंसेवी रक्तदात्यांचा कमी झालेला ओघ यामुळे रक्तटंचाई उद्भवल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांना फटका बसत आहे. मात्र, थॅलेसेमिया, सिकलसेलसारख्या गंभीर आजार असलेले रुग्ण व किडनीच्या विकारामुळे सतत डायलिसीसची गरज भासणार्या रुग्णांची रक्ताच्या टंचाईमुळे परवड होत आहे.
शहरासह जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा मोठ्या प्रमाणावर घटल्याने रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. दिवाळीच्या सुट्टीमुळे रक्तदात्यांनी रक्तदानाकडे पाठ फिरवली आहे. याशिवाय सेवाभावी संघटना, शाळा- महाविद्यालये, खासगी कंपन्यांनी तसेच निवडणुकीत गुंतल्यामुळे राजकीय पक्षांच्यावतीने होणार्या रक्तदान शिबिरांचा ओघही कमी झाला आहे. मागणी जास्त आणि उपलब्धता कमी झाल्याने आणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन रक्तपेढ्यांच्या वतीने केले जात आहे.
रक्तदात्यांनी स्वतःहून पुढे यावे
सध्यास्थितीत रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. शहरातील बहुसंख्य रुग्णालयांमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. शिवाय अपघातांचे वाढलेल्या प्रमाणामुळे रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. मागणी वाढलेली असतांना दुसरीकडे, विविध राजकीय पक्ष, सेवाभावी संघटना, शाळा, महाविद्यालये यांच्यावतीने होणारी शिबिरे कमी झाली आहेत. गैरसमज आणि भीतीपोटी आधीच रक्तदाते समोर येत नाहीत. निवडणुकांच्या धामधुमीचा परिणामही शिबिरावर झाल्याने रक्ताचा तुटवडा भासत आहे. रक्तदात्यांनी स्वतःहून पुढे यावे असे आवाहन रक्तपेढ्यांकडून करण्यात येत आहे.
थॅलेसेमिया, सिकलसेल, डायलिसीस रुग्णांचे हाल
शहर व जिल्ह्यामध्ये थॅलेसेमिया, सिकलसेल अशा आजाराच्या रुग्णांसह किडनी विकाराने ग्रस्त असलेले व डायलिसीसवरील रुग्ण, ऑर्गन तसेच बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी रक्तपिशव्यांची गरज भासते. मात्र, रक्तदात्यांनी पाठ फिरवल्याने ही गरज भरून काढणे जिकिरीचे झाले आहे. त्यातच रस्ते अपघात, लहानमोठ्या शस्त्रक्रियांसाठी रक्ताची गरज भासत आहे. त्यामुळे रक्तदान चळवळीला गती येण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
शहरातील रक्तपेढ्यांमध्ये उपलब्ध असलेला रक्तसाठा पुरेसा नसल्यामुळे डेंग्यू रुग्णांवरील उपचारांसाठी आवश्यक प्लेटलेट आणि इतर रक्तघटकांना असलेली मागणी आणि दिवाळी सुटीनिमित्त रक्तदात्यांच्या शहरातील अनुपस्थितीमुळे तुटवडा जाणवत असून रक्तपेढ्यांतील संकलन पूर्वपदावर आणण्यासाठी दात्यांनी पुढे येण्याची गरज आहे.
डॉ. दिलीप कोठावदे, रक्तमित्र, नाशिक.

