

नाशिक : श्रद्धेच्या आड अनेकांना गंडविणार्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या मालमत्तेचे आकडे बघून तपास यंत्रणाही चक्रावून गेल्या आहेत. त्याने आपल्या अनेक काळ्या धंद्यांतून दोन हजार कोटींची संपत्ती जमवल्याचे पुढे आले आहे. ब्लॅक मनी व्हाईट करून देण्याच्या त्याच्या फॉर्म्युल्याला अनेकजण भुलल्याने त्याला ही माया गोळा करता आली.
जमीन व्यवहारात खरातची विशिष्ट मोडस ऑपरेंडी होती. तो बड्या गुंतवणूकदाराला हाताशी धरून सामाईक स्वरूपात मालमत्ता खरेदी करायचा. उदाहरणार्थ, दोन कोटींचा जमीन व्यवहार असेल, तेव्हा तो केवळ 20 लाख रुपये गुंतवायचा. तर उर्वरित एक कोटी 80 लाख समोरच्यास गुंतवण्यास सांगायचा. त्यानंतर सातबारावर जमीन सामाईक पद्धतीने घेतली असल्याची नोंद करायचा.
पाथर्डी फाट्यावरील कोट्यवधी रुपयांची जमीन खरातने कवडीमोल भावात बळकवली. या भागातील सुमारे साडेतीन एकर जागा त्याने अवघ्या काही लाखांत घेतली. खरात हा अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी येऊन जागा बघून जात होता. पाथर्डी गावातील शेतकर्याने आर्थिक विवंचनेतून त्याची 20 गुंठे जागा विक्रीस काढली होती. त्यावेळी खरातसोबत त्याचा दोन कोटी रुपयांचा व्यवहार झाला होता. खरातने त्या शेतकर्यास केवळ 97 लाख रुपये देत त्याची संपूर्ण 69 गुंठे जागा बळकावली. याबाबतची माहिती देताना त्या शेतकर्यास आता अश्रू अनावर होत आहेत.
ईडीची एंट्री होणार
शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणात ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या-वतीने चौकशी केली जात असते. खरात प्रकरणात तब्बल दीड ते दोन हजार कोटींची बेनामी मालमत्ता समोर आल्यामुळे या प्रकरणात आता ईडीची एंट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या एसआयटीसह आयकर विभागाकडून या सर्व प्रकरणाची संयुक्त चौकशी केली जात आहे. आता ईडीदेखील या प्रकरणात उडी घेण्याची शक्यता आहे.
खरातची मालमत्ता
* पाथर्डीत 150 कोटींची 30 एकर जमीन
* सिन्नरच्या कहांडळवाडीत 5 कोटींची 45 एकर जमीन
* पाथर्डी, गौळाणेत 30 कोटींहून अधिक किमतीची जमीन
* गौळाणेत मोक्याच्या जागी 15 भूखंड
* सिन्नरमध्ये 1 कोटीचे 2 व्यापारी गाळे
* मिरगावात 10 कोटींहून जास्त किमतीचे फार्म हाऊस
* अहिल्यानगरमध्ये 5 एकरांचा कोट्यवधींचा भूखंड
* ओझर विमानतळाजवळ 5 कोटींची जमीन
* जानोरी, दहावा मैल भागात मोक्याच्या जागा
* नाशिकमध्ये कॅनडा कॉर्नरवर सुमारे एक कोटीचे ऑफिस
* कर्मयोगीनगरमध्ये 5 कोटींचा बंगला
* शिर्डीच्या पानमळ्यात 30 गुंठ्यांची कोट्यवधींची जागा
* निघोजमध्ये 4 एकरांची कोट्यवधींची जागा
* शिर्डी भागात 70 कोटींच्या जमिनी, प्लॉट
* घरी लाखोंची कॅश
* वेगवेगळ्या ठिकाणी 30 फ्लॅट
* सिन्नरमध्ये महत्त्वाच्या जागेवर दुकाने