नाशिक : गेल्या काही दिवसांपासून निफाड मतदारसंघाच्या उमेदवारीवरून निर्माण झालेली अनिश्चितता अखेर संपुष्टात आली असून, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे यतीन कदम यांचे स्वप्न मात्र भंगले आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे विधानसभा उमेदवारांची तिसरी यादी रविवारी (दि. 27) सकाळी जाहीर करण्यात आली. त्यात निफाड मतदारसंघातून दिलीप बनकर यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील मिळाला. भाजपच्या यतीन कदम यांनी या जागेवर दावा केला होता. त्यांनी अजित पवार यांचीही भेट घेत आपल्या पक्षाकडून उमेदवारी द्यावी अथवा भाजपला ही जागा सोडावी, असा आग्रह धरला होता. अजित पवार गटाच्या पहिल्या दोन याद्यांमध्ये निफाड मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाला स्थान मिळाले नसल्याने बनकर यांच्या उमेदवारीविषयी प्रश्नचिन्ह होते. मात्र तिसऱ्या यादीतून बनकर यांना दिलासा मिळाला आहे. बनकर हे अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पहाटेच्या शपथविधीसह महायुतीत सहभागी होताना ते आघाडीवर होते. सर्व आमदारांना उमेदवारी दिली असताना बनकर यांना प्रतीक्षेत ठेवल्याने चर्चांना उधाण आले होते. परंतु आपल्याला उमेदवारी नक्की मिळेल, असा विश्वास बनकर यांच्याकडून व्यक्त केला जात होता.
जिल्ह्यातील येवला, दिंडारी, सिन्नर, कळवण, देवळाली या मतदारसंघांतून विद्यमान आमदारांना राष्ट्रवादी अजित पवार गटाने यापूर्वीच उमेदवारी जाहीर आली आहे. तिसऱ्या यादीत निफाडसह फलटणमधून सचिन पाटील, पारनेरमधून काशीनाथ दाते, तर गेवराईतून विजयसिंह पंडित यांची उमेदवारी अजित पवार गटातर्फे जाहीर करण्यात आली आहे.