

नाशिक : महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर, तर मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीद्वारे स्वतंत्रपणे निवडणूक लढवित असले, तरी केंद्र व राज्यात आम्ही महायुतीद्वारे सत्तेत आहोत. त्यामुळे भाजप महायुतीचा धर्म पाळणार असून, महापालिका निवडणुकीत सत्तेतील घटक पक्षांवर होते.
कुठलीही टीका टिप्पणी न करण्याचे धोरण भाजपने अंगीकारले असल्याचे स्पष्टीकरण मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिले आहे. महापालिका निवडणुकीसाठी 'वसंतस्मृती' येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उपाध्ये यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी माध्यमांशी चर्चा करताना ते बोलत महापालिका निवडणुका महायुतीद्वारे लढविण्याचा प्रयत्न सुरुवातीला होता. परंतु दोन्ही पक्षांकडील इच्छुकांची मोठी संख्या आणि स्वबळावर निवडणुका लढविण्याचा स्थानिक पातळीवरील रेटा लक्षात घेता, स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली.
विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार असून, राज्याच्या विकासावर सर्वांचे एकमत असल्याचे उपाध्ये यांनी सांगितले. पक्षात आयारामांना झालेला विरोध आणि एबी फॉर्मवाटपावरून झालेल्या राड्यावरही त्यांनी भाष्य केले. उमेदवारीसाठी आग्रह धरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना चुकीच्या नाहीत. मात्र, उमेदवारीसाठी निवडून येण्याची क्षमताही महत्त्वाची होती. त्यानुसार उमेदवारीचा निर्णय पक्षाने घेतला. असे नमूद करत उमेदवारीवरून निर्माण झालेला वाद आता संपला आहे. आता निवडणुकीतील विजय हेच एकमेव लक्ष्य आहे. त्यासाठी राग लोभविसरून कार्यकर्ते कामाला लागले आहेत, असेही केशव उपाध्ये यांनी सांगितले.
निवडणूक युद्ध जिंकणे हेच लक्ष्य
उमेदवारीसाठी पैसे घेतल्याचा आरोपही उपाध्ये यांनी फेटाळून लावला. हा आरोप केवळ दंतकथा, अफवा असल्याचा दावा त्यांनी केला. उमेदवारीवरून पक्षात झालेल्या राड्याबाबत बोलताना संघटनात्मक वादावर १५ जानेवारीनंतरच निर्णय होईल, आता निवडणूक युद्ध जिंकणे हेच लक्ष्य असल्याचे उपाध्ये यांनी सांगितले.