

नाशिक : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्या बंडखोर व त्यांच्या समर्थकांना पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसताच पक्षातील निष्ठावंत पुन्हा एकदा आक्रमक बनले असून, पक्ष संघटनेला उपद्रव करणाऱ्यांना कदापि प्रवेश देऊ नये. प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, अशी गळ या निष्ठावंतांनी पक्षश्रेष्ठींना घातली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्या नाशिक दौऱ्यानंतर या निष्ठावंतांना पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट करावी लागली आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपमधील काही माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवारांविरोधात काम केल्याची गंभीर बाब समोर आली होती. काहींनी उघडपणे, तर काहींनी पक्षात राहून छुप्या पद्धतीने बंडखोरांना साथ दिली होती. या पार्श्वभूमीवर पक्षाने कठोर पावले उचलत सात माजी नगरसेवक व नऊ पदाधिकाऱ्यांना पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच, ज्यांनी पक्षविरोधात काम केले त्यांची नावे नाशिक महानगर भाजपकडे आलेली आहेत. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या नाशिक दौऱ्यात, बंडखोर किंवा पक्षविरोधी काम करणाऱ्यांना पक्ष प्रवेश देताना स्थानिक पदाधिकारी व संबंधित मतदारसंघातील आमदारांचे मत विचारात घेतले जाईल, स्पष्ट केले. यामुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते एकवटले असून, त्यांनी सातत्याने पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांना पक्षात स्थान देऊ नये, अशी स्पष्ट भूमिका व्यक्त केली आहे.
बंडखोरांनी साम, दाम, दंड, भेद यांसारख्या विविध राजकीय नीतीचा वापर करून महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात कार्य केले. तरीसुद्धा, नाशिक शहरातील भाजप महायुतीचे सर्व तिन्ही उमेदवार प्रचंड मतांनी विजयी झाले. ज्यांनी पक्षालाच आव्हान दिले, त्यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपने मोठी आघाडी घेतली, हे विशेष ठरले. पक्षविरोधी कार्य करणारे हे नेते स्वतःच्या निवडणुकीत लक्ष देण्यापेक्षा इतर निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत होते. असे असूनही, पक्षाच्या उमेदवारांचा विजय लक्षणीय ठरला. "जर बंडखोरांनी आव्हान उभे करूनही पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येत असतील, तर अशा नेत्यांच्या असण्याने किंवा नसण्याने पक्षाला काहीही फरक पडत नाही," असे मत निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी मांडत आहेत.
वास्तविक, लोकसभा निवडणुकीतसुद्धा काहींनी महायुतीविरोधात प्रचार केला होता. काही प्रमाणात त्याचाही फटका लोकसभेत बसला. आपण काहीही केले तरी पक्ष काही कारवाई करत नाही, असा संबंधितांचा भ्रम झाला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ज्यांना पक्षाने वेळोवेळी पदे देऊन मोठे केले होते, त्यातल्या काहींनी उघडपणे बंडखोरी करून पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी केली तर काहींनी त्यांना उघडपणे समर्थन देऊन त्यांचा प्रचार केला. हे एकप्रकारे भाजपला आव्हान देण्यासारखेच होते.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाविरोधात बंडखोरी करणाऱ्यांना तसेच या बंडखोरांना रसद पुरवून पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना पुन्हा भाजपमध्ये प्रवेश दिला जाऊ नये, अशी पक्षातील निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मत आहे.
- सुनील केदार, शहर सरचिटणीस, भाजप.