

स्वीकृत नगरसेवकपद वर्षभरासाठीच
उबाठाच्या दोघांसह दहा उमेदवारांचे अर्ज महापालिका आयुक्त मनिषा खत्रींना सादर
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इच्छुकांच्या बेसुमार गर्दीमुळे बेजार झालेल्या सत्तारूढ भाजपसह शिवसेना शिंदे गटाने स्वीकृत नगरसेवकपद एक-एक वर्षासाठी देण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार भाजपचे सहा, तर शिंदे गटाने दोन उमेदवारांचे अर्ज बुधवारी (दि. ४) महापालिका आयुक्तांना सादर केले. उबाठाने मंगळवारी (दि. ३) आपल्या कोठ्यातील दोन अर्ज सादर केल्यामुळे स्वीकृत नगरसेवकपदाच्या १० जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्णस आली.
दरम्यान, उबाठाने डावलल्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसला सोबत घेऊन सातव्या जागेवर दावा सांगण्याचा भाजपचा डाव कायदेशीर अडचणींमुळे अपयशी ठरला.
गेल्या नऊ महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या स्वीकृत नगरसेवक निवडीला उच्च न्यायालयाच्या अल्टीमेटममुळे अखेर मुहूर्त लागला.
महापालिकेत राजकीय पक्षांच्या संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीचा कोटा ठरविण्यात आल्याने सत्तारूढ भाजपला १० पैकी सहा, तर शिंदे गट व उबाठा-कंग्रिस आघाडीच्या वाट्याला प्रत्येकी दोन जागा आल्या.
स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपकडे सर्वाधिक ३०० हून अधिक, तर शिंदे गटाकडे तब्बल पाऊणशे इच्छुक रंगेत होते. त्यांनी या पदावर आपली वर्ण लागावी, यासाठी थेट दिल्ली-मुंबईपर्यंत वशिला लावल्यामुळे उमेदवारी निश्चित करताना पक्षनेतृत्वाची चांगलाच कस लागला. पक्षनेत्यांनी उमेदवारी निश्चित करताना पक्षासाठी घातक ठरण्याची शक्यता होती.
त्यामुळे पाच वर्षे मुदतीचे स्वीकृत नगरसेवकपद एक-एक वर्ष मुदतीसाठीच करण्याचा व त्या अनुषंगाने उर्वरित चार वर्षांसाठी स्वीकृत नगरसेवक पदावर २४ इच्छुकांना संधी देत, नाराजी कमी करण्याचा धोरणात्मक निर्णय भाजपला घ्यावा लागला. शिंदे गटानेदेखील तोच कित्ता गिरवित स्वीकृत नगरसेवकपदावर एक-एक वर्षासाठी नियुक्ती दिली आहे.
भाजपने सहा जागांसाठी उमेदवारी निश्चित करताना, पक्षातील निष्ठावानांना संधी दिली. भाजपच्या कोठ्यातून सहा मुख्य प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण, महिला मोर्चाच्या माजी शहराध्यक्षा रोहिणी नायडू,
गंगा-गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, रामहरी संभेराव, हेमंत धात्रक, संदीप लेनकर यांचे अर्ज महापौर हिम्मोरीज आहेर-आडोके व भाजप गटनेते ॲड. श्याम बडोडे यांच्या हस्ते आयुक्त खत्री यांना सादर करण्यात आले.
शिंदे गटाकडून उपनेते अजय बोर्से, विजय करंजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विनायक तथा बाबूराव आढाव, चंद्रकांत लवटे यांचे अर्ज आयुक्त मनिषा खत्री यांना अर्ज सादर करण्यात आले. शिंदे गटातर्फे देण्यात आलेले दोन्ही उमेदवार हे नाशिकरोड विभागातील आहेत.
नाशिकरोड विभागातून उबाठाचे १० नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे आढाव, लवटे यांच्या रूपाने शिंदे गटाने नाशिकरोड विभागात आपला पाया भक्कम करण्याचा प्रयत्न केला.
उबाठाकडून ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब गायकवाड यांच्यासप उपनेते दत्ता गायकवाड यांचे चिरंजीव हेमंतकुमार गायकवाड यांना स्वीकृत नगरसेवकपदावर संधी देण्यात आली. भाजप-शिंदे गटाने स्वीकृत नगरसेवकपद एका वर्षासाठी दिले असले, तरी उबाठाने मात्र निर्णय घेतलेला नाही. उबाठाने स्वीकृत नगरसेवकपद पाच वर्षांसाठी दिले आहे. त्यामुळे उबाठातील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजपमधून खुद्द शहराध्यक्ष सुनील केदार हेही इच्छुक होते. स्वीकृत नगरसेवक पदावर संधी मिळावी यासाठी त्यांनी पक्षाकडे मागणी केली थी. उमेदवारी अर्ज करण्यासाठी ते महापालिकेच्या मुख्यालयातील भाजप गटनेता कार्यालयात हजर झाले होते.
परंतु, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्यास अवघे २० मिनिटे शिल्लक असताना, प्रदेशकडून आलेल्या यादीत त्यांचे नाव नव्हते. त्यामुळे पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठीदेखील ते हजर राहिले नाहीत. ते नाराज झाल्याची चर्चा होती. आपण नाराज नसून, पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे केदार यांनी स्पष्ट केले.