Nashik News | नाशिकसाठी आज मोठ्या गुंतवणुकीची घोषणा शक्य

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत 'महाराष्ट्राची उद्योग भरारी'

Big investment announcement possible for Nashik today
नाशिकसाठी आज मोठ्या गुंतवणुकीची घोषणा शक्यPudhari Photo
Published on
Updated on

नाशिक : मुंबई, पुण्यासह छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या घोषणा होताना नाशिकला मात्र वेळोवेळी डावलले गेले आहे. याशिवाय महिंद्रा अॅण्ड महिंद्राकडून महाराष्ट्रात, त्यातही नाशिकमध्ये विचाराधीन असलेली गुंतवणूक अन्यत्र हलविण्यात आली. याबाबतचे जेव्हा 'दै. पुढारी'ने वृत्त प्रसिद्ध केले होते, तेव्हा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिकमध्ये येत लवकरच नाशिकला मोठी गुंतवणुकीची घोषणा केली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. ३) मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या 'महाराष्ट्राची उद्योग भरारी' या कार्यक्रमात नाशिकमध्ये मोठ्या गुंतवणुकीची घोषणा शक्य असल्याची अपेक्षा उद्योग वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

शासनाने राबविलेल्या लोकाभिमुख योजना नाशिक विभागातील जनतेस माहिती व्हाव्यात या हेतूने गुरुवारी (दि. ३) सकाळी १० वाजता त्र्यंबक रोडवरील हॉटेल डेमोक्रॉसी येथे 'उद्यमात सकल समृद्धी, महाराष्ट्राची उद्योग भरारी' हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रमुख उपस्थितीमध्ये अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची असणार आहे. याशिवाय खासदार शोभा बच्छाव, राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित असतील. या कार्यक्रमात नाशिकसाठी प्रतीक्षेत असलेल्या मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

गेल्या काही काळापासून नाशिकला एकही मोठी गुंतवणूक दिली नसून, शेजारील जिल्ह्यांमध्ये गुंतवणुकीच्या घोषणा करून नाशिकवर मोठा अन्याय केला आहे. या विषयाला 'दै. पुढारी'ने वाचा फोडल्यानंतर उद्योगमंत्री सामंत यांनी नाशिकमध्ये तडकाफडकी पत्रकार परिषद घेत लवकरच नाशिकला मोठ्या गुंतवणुकीची घोषणा करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे उद्योगभरारी कार्यक्रमाकडे उद्योग वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

शब्द खरा ठरेल काय?

काही दिवसांपूर्वीच जेव्हा उद्योगमंत्री सामंत नाशिकमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले होते, तेव्हा त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच मोठ्या गुंतवणुकीची घोषणा करणार असल्याचे स्पष्ट केले होते. आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता असल्याने, उद्योग भरारी या कार्यक्रमातच दिलेला शब्द खरा ठरणार काय? अशी चर्चा आता उद्योग वर्तुळात रंगत आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनीदेखील जिल्ह्यातील उद्योग जगताशी संबंधित अनेक घोषणा केल्या होत्या. मात्र, त्यातील एकाही घोषणेची पूर्तता केली नसल्याने याबाबतही आज निर्णय होण्याची शक्यता आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आठ दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये येत गोड बातमी देण्याबाबतचे सुतोवाच केले होते. त्यामुळे उद्योग जगतासह अवघ्या नाशिककरांचे त्यांच्याकडे लक्ष लागून आहेत. ते गोड गिफ्ट देऊन जातील अशी अपेक्षा असून, त्यासाठी निमा म्हणून आम्हीदेखील आग्रही असणार आहोत.

- धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news