दिंडोरीतून भास्कर भगरे यांना उमेदवारी; अखेर शरद पवार गटाचा सस्पेन्स संपला

दिंडोरीतून भास्कर भगरे यांना उमेदवारी; अखेर शरद पवार गटाचा सस्पेन्स संपला
Published on
Updated on

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : लोकसभेच्या दिंडोरी मतदार संघातील शरद पवार गटाचा सस्पेन्स अखेर संपुष्टात आला आहे. भास्कर भगरे यांची पक्षाने शनिवारी (दि.30) उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मतदारसंघात आता केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे असा सामना रंगणार आहे.

शरद पवार गटाने त्यांच्या उमेदवारांची यादी अखेर घोषित केली आहे. या यादीत भगरे यांना दिंडोरीतुन उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघात भाजपाकडून भारती पवार यांच्या नावावर अगोदरच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मात्र, पवार गटातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत अनिश्चितता होती. त्याच कारण म्हणजे अनेक इच्छुकांनी सिल्वर ओकवर उमेदवारीसाठी चकरा मारल्या. पण पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी भगरे यांच्या नावावरच शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून दिंडोरी मतदार संघातून लढतीबाबतचे चित्र अखेर आज स्पष्ट झाले.

भास्कर भगरे यांना पक्षाने यापूर्वीच तयारीला लागण्याचे आदेश दिले होते. मात्र मधल्या काळात माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी आमदार जे. पी. गावित, गोकुळ झिरवाळ आदीनी उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला होता. त्यामुळे भगरे यांची धाकधूक वाढली होती. पण पक्षानं भगरेंवर विश्वास दाखवत उमेदवारी दिल्याने दिंडोरीत समाधान व्यक्त केले जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news