

मालेगाव, पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी शासनाने ठरवून दिलेल्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम घेऊ असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान शेतकर्यांची आर्थिक लूट करणार्या दोन सीएससी केंद्रावर महसूल, कृषी आणि पंचायत समितीच्या संयुक्त पथकाने छापा टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे. शेतकर्यांची आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील तालुका भरारी पथक अॅक्शन मोडमध्ये आले आहे.
विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणार्या नुकसानीपासून शेतकर्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना पिकविमा दिला जातो. जास्तीत जास्त शेतकर्यांना या पीक विमा योजनेत भाग घेता यावा यासाठी केंद्र सरकारने खरीप 2024 साठी एक रुपयात पीक विमा योजना सुरु केली आहे. त्यासाठी शासनाने शेतकर्यांच्या सोयीसाठी अधिकृत बँकेत किंवा कॉमन सर्विस सेंटरच्या मदतीने तसेच पोर्टलच्या सहाय्याने शेतकर्यांना विमा योजनेत सहभाग नोंदवता येणार आहे.
त्यासाठी शासनाने 1 रुपया दर निश्चित केला आहे. तसेच सीएससी केंद्र चालकांना शेतकर्यांकडून फक्त एक रुपयाच घेऊन पीक विमा काढण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. असे असताना देखील शहरातील किशोर बच्छाव यांच्या ऑल ईज वेल आणि चेतन राजपूत यांच्या सह्याद्री ऑनलाईन सर्विसेस केंद्रावर शासनाने ठरवून दिलेल्या रक्कमेपेक्षा जास्त दर घेत असल्याची माहिती समोर आली आहे. शेतकर्यांकडून पैसे घेऊन पीक विमा काढला जात असल्याची तसेच त्यांना तासंतास बसवून ठेवत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानुसार तहसीलदार डॉ. उमा ढेकळे, गटविकास अधिकारी अजितसिंग पवार, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोर्डे, अव्वल कारकून भरत शेवाळे यांच्या पथकाने पाहणी केली असता तक्रारीत तथ्य आढळले.
यावेळी पथकातील अधिकार्यांनी केंद्रातील कागदपत्रांची पाहणी केली. या दोन्ही केंद्रांचे परवाने निलंबित करण्यासाठी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव पाठविण्यात आले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी गोर्डे यांनी दिली आहे.