

देवळाली कॅम्प : सुधाकर गोडसे
भूगर नगर परिषदेच्या सत्ताबदलाचा केंद्रबिंदू ठरलेल्या राजवाडा परिसरातील कचरा डेपो पुन्हा एकदा चर्चेच्या अग्रस्थानी राहिला असून, येथील नागरिकांनी आमच्या आरोग्याचे काय? असा सवाल नगर परिषदेला करत सत्ताबदलाचे हेच बक्षीस काय? असा प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.
या निमित्ताने पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर येऊ पाहत आहे. भगूर आठवडे बाजारलगत असलेल्या घनकचऱ्यामुळे प्रभाग दहामधील मुख्यतः नवीन वसाहत असलेली राजवाडा दलित वस्ती येथील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अनेक नागरिकांना श्वसनाचे विकार जडले आहेत.
या त्रासाला कंटाळून येथील नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी नगर परिषदेला हा घनकचरा अन्यत्र हलवण्यासाठी निवेदने दिली. त्याची दखल घेऊन नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी येथील घनकचरा योग्य ठिकाणी टाकण्याबाबत प्रशासनाला सूचित केले होते. परंतु प्रशासनाने राजवाडा वसाहतीलगतच्या नाल्यात व खड्यात तो कचरा टाकला. तेथे अगोदरच आठवडे बाजाराच्या घनकचऱ्यामुळे त्रास जाणवत होता.
नागरी वस्तीजवळच हा कचरा आणून टाकल्यामुळे रहिवाशांना दुर्गंधीचा दुप्पट त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात लहान मुले खेळत असतात. राजवाड्यामधून वाहत येत असलेल्या मोठ्या नाल्यात एखादे मूल पडलं तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
नगर परिषदेवर दंडात्मक कारवाई करा
भगूर नगर परिषदेने कचरा उघड्यावर फेकल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा रहिवाशांना दिलेला आहे. आता खुद्द पालिका प्रशासनाकडून राजवाडा वसाहतीलगत कचरा टाकून दिला जात असल्याने नगर परिषदेवर दंडात्मक कारवाई का करू नये, अशी विचारणा स्थानिकांनी केली आहे.
हेलिकॉप्टर व कचऱ्याचा धुरळा
निवडणूक काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर याच भागात उतरत असताना परिसरात उडालेल्या कचऱ्याबाबतचा व्हिडिओ राष्ट्रवादीने व्हायरल करत जनमानसात केलेला प्रचार सत्तावदलाला कारणीभूत ठरल्याची चर्चा होती. आता हाच मुद्दा चर्चिला जात आहे.