

नाशिक : महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करावे. आपापसातील हेवेदावे, मतभेद, मनभेद विसरून नाशिक महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा, असे आवाहन करताना आगामी महापालिका निवडणूक महायुती एकत्र लढवेल, अशी अपेक्षा असली तरी ऐनवेळी वेगळा निर्णय झाल्यास स्वबळावर निवडणुका लढविण्याची तयारी ठेवा, सर्वच १२२ जागांवर सक्षम उमेदवार देण्यासाठी सज्ज रहा, असा सूचक संदेश शिंदे गटाचे युवा नेते खा. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला. निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी २४ मे रोजी नाशिक दौऱ्यावर येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बाळासाहेब भवन येथे खा. शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शिंदे गटाची बैठक पार पडली. यावेळी खा. शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांशी विधानसभा मतदारसंघनिहाय वन-टू-वन संवाद साधताना महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना बांधणी करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने बुथप्रमुखांच्या नेमणुका, प्रभागनिहाय, शाखानिहाय पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रत्येक प्रभागनिहाय पदाधिकाऱ्यांच्या कामांचा आढावा घेताना इच्छूकांच्या नावांची चाचपणी देखील खा. शिंदे यांनी केली. महापालिका निवडणुकांसाठी भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) सोबत महायुती होण्याची शक्यता आहे. मात्र ऐनेवळी निर्णय बदलल्यास सर्वच १२२ जागा लढविण्याची तयारी ठेवा. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी शहर विकासासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या प्रभाग विकास निधीच्या माध्यमातून झालेल्या कामांचे ब्रँडिंग करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या. निवडणूक तयारीसंदर्भात आढावा घेण्यासाठी येत्या २४ मे रोजी नाशिकचा दौरा करणार असल्याचे खा. शिंदे यांनी यावेळी सांगितले. या बैठकीसाठी पक्षाचे सचिव राम रेपाळे, भाऊसाहेब चौधरी, संजय मोरे, उपनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर, माजी खासदार हेमंत गोडसे, राजु लवटे, महानगरप्रमुख प्रविण तिदमे आदी उपस्थित होते.
शिंदे गटात वर्चस्ववादावरून गटबाजी सुरू आहे. उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते व महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्यातील गटबाजीमुळे पक्षात सुंदोपसुंदी सुरू आहे. तिदमे गटाला सचिव भाऊसाहेब चौधरी यांचा आशीर्वाद असल्यामुळे ते गटबाजीला खतपाणी घालत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यावरून रेपाळे यांची सचिवपदी नियुक्ती करून चौधरी यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न झाला. गुरुवारच्या बैठकीत खा. शिंदे यांनी गटबाजी करणाऱ्यांना भाषणातून कानपिचक्या दिल्या. विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी देऊन गटबाजी संपविण्याची शक्कल पक्षाकडून लढविली जाण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेच्या बळकटीकरणासाठी प्रभागनिहाय सदस्य नोंदणी अभियान राबविण्याचे आदेश खा. शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. शुक्रवार (दि.१६) पासूनच या अभियानाला सुरुवात केली जाणार आहे. प्रत्येक प्रभागात किमान दहा हजार सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट्य देण्यात आले आहे.