

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करावा, द्विपक्षीय करारांची अंमलबजावणी करावी, प्रोत्साहन योजनेतील भेदभाव दूर करावा, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण रोखावे आदी मागण्यांसाठी बँक कर्मचारी-अधिकारी संघटनांनी पुकारलेल्या तीन दिवसांच्या संपामुळे नाशिक जिल्ह्याच्या आर्थिक व्यवहारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
सोमवार (दि. २८), मंगळवार (दि. २९) आणि बुधवार (दि. ३०) या तीन दिवसांत जिल्ह्यातील सुमारे ५ हजार कोटी रुपयांचे बँकिंग व्यवहार प्रभावित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोमवारी (दि. २८) सकाळी १० वाजता ईदगाह मैदान येथे संघटनांकडून निदर्शने केली जाणार आहेत.
संपात सात कर्मचारी-अधिकारी संघटनांचे सुमारे साडेतीन हजार कर्मचारी सहभागी होणार असून, जिल्ह्यातील १२ राष्ट्रीयीकृत बँकांच्या ६५० हून अधिक शाखांवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार, बांधकाम, कृषी, व्यावसायिक व्यवहारांसह धनादेश वटवणी, रोख व्यवहार, कर्जविषयक कामकाज आणि विविध देयकांच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
नाशिक हा औद्योगिक व व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा असल्याने दररोज मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार बँकिंग यंत्रणेमार्फत होतात. त्यामुळे सलग तीन दिवस शाखांचे कामकाज बंद राहिल्यास प्रलंबित व्यवहारांचा ताण पुढील कामकाजाच्या दिवशीही जाणवण्याची शक्यता आहे.
विशेषतः उद्योग व व्यापारी क्षेत्रातील धनादेश, आरटीजीएस, एनईएफटी, रोख रकमेची मागणी, कर्जविषयक प्रक्रिया तसेच विविध संस्थांचे देयक व्यवहार यावर परिणाम होऊ शकतो. परिणामी, तीन दिवसांत सुमारे ५ हजार कोटींच्या व्यवहारांना ब्रेक लागण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा अंदाज संभाव्य व्यवहारांच्या आधारे असून, प्रत्यक्ष परिणाम संपातील सहभाग आणि डिजिटल माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवर अवलंबून राहणार आहे.
संपाचा नाशिकला फटका / १२ राष्ट्रीयीकृत बँकांचा सहभाग:
३ दिवस बँकांचा संप
३,५०० कर्मचारी-अधिकारी सहभागी
६५०+ राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा प्रभावित
१२ राष्ट्रीयीकृत बँकांचा सहभाग:
५,००० कोटींचे संभाव्य प्रभावित व्यवहारांचा अंदाज
यूपीआय/इंटरनेट बँकिंग सुरू राहणार
एटीएमवर अतिरिक्त ताणाची शक्यता
रविवारी बँका सुरू; मात्र कामकाजात विस्कळीतपणा:
सलग तीन दिवसांचा संप असल्याने काही राष्ट्रीयीकृत, खासगी आणि सहकारी बँकांनी रविवारी (दि. २७) सुट्टीच्या दिवशीही बँका सुरू ठेवून आवश्यक कामकाज करण्याचा निर्णय घेतला. चेक क्लिअरिंगसह अन्य महत्त्वाचे बँकिंग व्यवहार रविवारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, कर्मचारी संघटनांमधील समन्वयाच्या अभावामुळे रविवारी सर्वच बँकांमध्ये एकसारखे चित्र दिसून आले नाही. काही कर्मचारी कामावर हजर झाले, तर काहींनी रजा घेतली. विशेषतः लिपिक व शिपाई संवर्गातील कर्मचारी काही शाखांमध्ये उपस्थित होते. सुट्टीच्या दिवशी काम केल्यामुळे अतिरिक्त मोबदला मिळणार असल्याने काही कर्मचाऱ्यांनी रविवारी काम करण्यास प्राधान्य दिल्याची माहिती आहे. मात्र, अधिकारीवर्गाची उपस्थिती मर्यादित असल्याने काही शाखांमध्ये कामकाज पूर्ण क्षमतेने होऊ शकले नाही.
बँक कर्मचारी प्रतिक्रिया:"गेल्या १,०२० दिवसांपासून आमच्या मागण्यांसाठी शासनासोबत बोलणी सुरू आहेत. मात्र, आम्हाला योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने यावेळचा संप अटकेपार असणार आहे. तीन दिवसांच्या संपानंतरही तोडगा न निघाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र केले जाईल."
- आदित्य तुपे, संपर्करी, बँक कर्मचारी
डिजिटल व्यवहार सुरू, पण...:
बँकांच्या शाखा बंद असल्या तरी यूपीआय, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि एटीएम सेवा सुरू राहणार आहेत. त्यामुळे डिजिटल माध्यमातून होणारे पैसे हस्तांतरण आणि इतर व्यवहार सुरू राहतील.
मात्र, शाखांमधील रोख व्यवहार बंद राहिल्याने मोठ्या प्रमाणावर ग्राहक एटीएमचा आधार घेण्याची शक्यता आहे. परिणामी, तीन दिवसांत एटीएमवर अचानक ताण वाढू शकतो. काही ठिकाणी रोकड उपलब्धता, तांत्रिक अडचणी किंवा व्यवहारांची मर्यादा यामुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.