

लासलगावः बांगलादेश सरकारने ७ डिसेंबरपासून मर्यादित प्रमाणात कांदा आयात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने भारतातील कांदा निर्यातदारांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशांतर्गत बाजार स्थिर ठेवण्यासाठी बांगलादेशने दररोज ५० आयात परवाने देण्याची घोषणा केली असून, प्रत्येक परवान्यानुसार ३० टन कांदा आयात करता येणार आहे.
या निर्णयाचा थेट फायदा भारताच्या कांदा निर्यात क्षेत्राला होईल, असे व्यापार मंडळाचे मत आहे. बांगलादेश हा भारताचा परंपरागत व मोठा कांदा आयातदार देश आहे. मागील काही महिन्यांपासून बांगलादेशात आयात बंद असल्याने महाराष्ट्रातील नाशिक, लासलगाव, पिंपळगावसह आशियातील सर्वात मोठ्या कांदा बाजारांवर त्याचा परिणाम दिसून येत होता.
निर्यात मार्ग खुला होताच भारतीय कांदा व्यापाराला आणि दर स्थिरतेला आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मर्यादित आयात परवाने मिळूनही बांगलादेशकडून मागणी वाढेल, यामुळे सध्या घटलेल्या कांदा दरांमध्ये काही प्रमाणात सुधारणा होऊ शकते.
बांगलादेश सरकारने स्पष्ट केले आहे की नियंत्रित पद्धतीने आयात प्रक्रिया बाजारस्थिती पाहून पुढील आदेशापर्यंत सुरू राहील. त्यामुळे आगामी काही आठवड्यांत भारतातून बांगलादेशकडे होणाऱ्या कांदा निर्यातीला गती येण्याची शक्यता अधिक असल्याचे कांदा निर्यातदार विकास सिंह यांचे मत आहे.