नाशिक : कांदा उत्पादकांचे 'पानिपत' करण्याचा भाजपचा डाव | जयंत पाटील यांची टीका

जयंत पाटील यांची टीका; सिन्नरला शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत
शिवस्वराज्य यात्रा, सिन्नर
सिन्नर : शिवस्वराज्य यात्रेनिमित्त झालेल्या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील.(छाया : संदीप भोर)
Published on
Updated on

सिन्नर : इतिहासात काही वर्षांपूर्वी अफगाणिस्तानातून अहमदशहा अब्दाली हिंदुस्तानवर चालून आला होता. त्या लढाईत मराठ्यांचे 'पानिपत' झाले. काल परवा भाजपचे नेते अमित शाह महाराष्ट्रात आले आणि शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव मिळत असताना त्यांनी अफगाणातून कांदा आयात केला. त्यावरून आता कांदा उत्पादकांचे 'पानिपत' करण्याचा भाजपचा डाव स्पष्ट दिसतो, अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

शिवस्वराज्य यात्रेनिमित्त झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार अमोल कोल्हे, राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे, ज्येष्ठ नेते हेमंत टकले, श्रीराम शेटे, मेहबूब शेख, संगीता पाटील, आमदार सुनील भुसारा, माजी आमदार नितीन भोसले, संभाजी कांबळे, भारत कोकाटे, संजय सानप, राजेश गडाख, पुरुषोत्तम कडलग, डॉ. रवींद्र पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते. औरंगजेबने २६ वर्षे महाराष्ट्रात घालवली. मात्र त्याला महराष्ट्र जिंकता आला नाही, त्यामुळे आताही अमित शाह यांना यश येणार नाही. मराठी जनता भाजपचा पराभव करण्यासाठी सज्ज असून, राष्ट्रवादी शिवसेना पक्ष फोडल्याचा रागही मराठी माणसाच्या मनात आहे, असेही पाटील म्हणाले. केंद्र सरकारने रद्द केलेले शेतकरीविरोधी तीन काळे कायदे पुन्हा आणावेत असे भाजपच्या खासदार कंगणा राणावत म्हणत आहेत. यावरून शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याची भाजपची नियत असल्याचे स्पष्ट होते, असे टिकास्त्र खासदार कोल्हे यांनी सोडले. जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, राजाराम मुरकुटे, बाळासाहेब वाघ यांचीही भाषणे झाली. या सर्वांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काम करणार असल्याची ग्वाही दिली. तालुकाध्यक्ष संजय सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजाभाऊ, त्यांना 'आतून'च इकडे आणा

लोकसभा निवडणुकीत राजाभाऊ वाजे निवडून येणारच होते. पण, निकालानंतर काही जण आपण राजाभाऊंचे 'आतून' काम केल्याचे सांगत आहेत, असा मिश्कील टोला जयंत पाटील यांनी मारला. त्यावर सभेत हशा पिकला. पाटील यावरच थांबले नाही, तर 'आतून' काम करणाऱ्यांना आता 'आतून'च आपल्या पक्षात आणा, असे आवाहन त्यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांना केले. त्यामुळे 'आयात' उमेदवार नको, असे म्हणणाऱ्या स्वपक्षीयांचे चेहरे मात्र पाहण्यासारखे झाले.

सिन्नरची जागा 'तुतारी'ला ?

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांनी सिन्नरमधून 'तुतारी'चा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी घेतल्याचे जाहीरपणे सांगत सिन्नरची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सुटणार असल्याचेच जणू संकेत दिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news