पंचवटी : रामकुंडामध्ये वाहत्या पाण्यात अंघोळीसाठी उतरलेल्या नाशिक रोड येथील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शनिवारी (दि. 31) दुपारी घडली आहे. आराध्य मोहन कऱ्हाडकर (१४) असे त्याचे नाव आहे. (Ramkunda swimming accident)
आराध्य शनिवारी (दि. 31) रोजी सकाळी शिकवणीला जाण्यासाठी घरातून सायकलवर बाहेर पडला होता. तो मित्र अमोल बिन व अक्षय शिंदे यांच्यासमवेत रामकुंडावर आला होता. दुपारी 1 च्या सुमारास अमोल, अक्षय व आराध्य यांनी पाण्यात उड्या मारल्या. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अमोल आणि अक्षय तत्काळ काठावर आले. मात्र, आराध्य बुडाला आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेला. या घटनेची माहिती घाटावरील नागरिकांनी पंचवटी पोलिस व अग्निशमन दलाला कळवताच पंचवटी अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवरक्षक दलाच्या सहायाने आराध्यचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुपारी 4 पर्यंत तो सापडला नव्हता. सायंकाळी 5 च्या सुमारास गाडगे महाराज पुलाजवळील पात्रात त्याचा मृतदेह अग्निशमन दल व जीवरक्षक दलाच्या जवानांनी पाण्याबाहेर काढला. आराध्य हा वृत्तपत्र विक्रेता मोहन कऱ्हाडकर यांचा मुलगा आहे.