

मालेगाव : 6 डिसेंबर बाबरी पतन दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. या दिवशी मुस्लीम संघटनांकडून निषेध दिवस पाळला जातो. या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुका शांततेत झाल्या. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. अनेक सण व उत्सवात नागरिकांनी शांतता कायम राखली आहे. शुक्रवारी (दि. 6) शांतीच्या मार्गाने बाबरी पतन दिनाचा निषेध करत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची ग्वाही शांतता समितीच्या वतीने बैठक घेण्यात आली.
शहराची कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याचे आवाहन करत कायदा हातात घेणार्यांविरद्ध कारवाई करण्याचा इशारा अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी दिला आहे. शहरात शुक्रवारी (दि. 6) बाबरी पतन दिनाचा निषेध केला जाणार आहे. काही संघटना रस्त्यावर उतरून अजान देत असतात, तर काही संघटनांकडून प्रशासनाला निवेदने सादर केली जातात. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढविला आहे. पोलिस प्रशासन परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. कुणीही रस्त्यावर उतरून कायदा हातात घेऊ नये. शहराची शांतता भंग होणार नाही याची खबरदारी घ्यावी. सोशल मीडियावर सायबर सेलने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अफवा पसरविणारे किंवा जातीय तणाव निर्माण करणारे संदेश, व्हिडिओ व्हायरल केल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.