

मालेगाव (नाशिक) : शहरातील नुमानी नगर भागात सोमवारी (दि. १३) सायंकाळी आंध्र व महाराष्ट्रच्या एटीएस पथकाने छापा टाकून एका संशयीताला ताब्यात घेतले. टेलरींग काम करणारा संशयित हाफिज तौसीफ अस्लम शेख हा गेल्या काही महिन्यापासून मोबाईल व व्हाॅट्सअपच्या माध्यमातून शेजारी राष्ट्रांशी संपर्क साधून होता. तौसिफने नेमकी काय माहिती शेजारी राष्ट्रांना दिली याविषयी निश्चित माहिती नाही. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
आंध्र प्रदेश एटीएस च्या पथकाला यासंदर्भात काही धागेदोरे मिळाले. सोमवारी (दि.13) दुपारी आंध्र व महाराष्ट्र एटीएस च्या पथकाची दहा वाहने शहरात धडकली. एक, दोन वरिष्ठ अधिकारी वगळता स्थानिक पोलीस याबाबत अनभिज्ञ होते. सायंकाळी नुमानी नगरात कारवाईला जाताना ऐनवेळी पवारवाडी पोलिसांचा बंदोबस्त मागविण्यात आला. एकाच वेळी पोलिसांची एवढी वाहने पाहून या भागातील रहिवाशांची भंबेरी उडाली. या भागातील हाफीज तौसीफ यांच्या घरातून त्याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीनंतर या पथकांनी त्याला तातडीने नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद हाॅल येथे चौकशीसाठी आणले. रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशातही एटीएसने या पद्धतीने काही कारवाया केल्याचे समजते.
दरम्यान हाफीज तौसीफ याच्या कुटुंबीयांनी तो निर्दोष असल्याचा दावा केला आहे. काही महिन्यापूर्वी त्याचा मोबाईल हॅक झाला. याबाबत त्याने अनेक मित्रांना मेसेज देखील पाठविल्याचे सांगितले. याच मोबाईलचा गैरवापर झाल्याचा संशय आहे.