

नाशिक : शहरातील चार मतदारसंघांपैकी नाशिक पश्चिम मतदारसंघातील लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले असताना नाशिक मध्य, नाशिक पूर्व आणि देवळाली या तीन मतदारसंघांतील प्रमुख लढतींचे चित्र अद्यापही धूसरच आहे. नाशिक मध्य मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे गेल्याने काँग्रेस पक्षातून 'सांगली पॅटर्न'ची भाषा सुरू झाली असताना प्रतिस्पर्धी भाजपकडूनही अद्याप उमेदवारीची घोषणा न झाल्याने आमदार देवयानी फरांदे 'वेटिंग'वर आहेत. नाशिक पूर्व मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला पेच कायम असून, देवळालीतून माजी आमदार योगेश घोलप यांना उमेदवारीच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.
महायुतीकडून जिल्ह्यातील १५ पैकी १२ मतदारसंघांतील उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने उमेदवारीची घोषणा करण्यात आघाडी घेतली असली तरी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने जिल्ह्यातील एकही उमेदवार जाहीर केलेला नाही. शहरातील चार मतदारसंघांपैकी केवळ नाशिक पश्चिम मतदारसंघातील चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघातू महायुतीतर्फे भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे, शिवसेना ठाकरे गटातर्फे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, मनसेतर्फे दिनकर पाटील, तिसऱ्या आघाडीतर्फे स्वराज्य पक्षाचे दशरथ पाटील यांना उमेदवारी घोषित झाली आहे. नाशिक मध्य, नाशिक पूर्व व देवळाली मतदारसंघांत महायुती, महाविकास आघाडीतील रस्सीखेच कायम राहिल्याने गुरुवारी सायंकाळपर्यंत या मतदारसंघातील उमेदवारीचा पेच सुटू शकलेला नव्हता.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असलेला नाशिक मध्य शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्याने काँग्रेसमध्ये नाराजीची लाट उसळली आहे. या मतदारसंघातून सांगली पॅटर्न राबविण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केली जात असून, काँग्रेसतर्फे इच्छुक असलेल्या डॉ. हेमलता पाटील यांनीदेखील बंडाचा झेंडा उभारला आहे. दुसरीकडे भाजपने या मतदारसंघातून अद्याप उमेदवारी जाहीर न केल्याने विद्यमान आमदार प्रा. देवयानी फरांदे यांची अस्वस्थता वाढली असून, त्यांनी मुंबई वाऱ्या सुरू केल्या आहेत. या मतदारसंघात भाजपतर्फे स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर, सुरेश पाटील, शिवाजी गांगुर्डे यांचेही नाव उमेदवारीसाठी पुढे आले आहे.
नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदार राहुल ढिकलेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप ठरू शकलेला नाही. महाविकास आघाडीतही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. या मतदारसंघात मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांनी पक्षाशी बंडखोरीत शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. या ठिकाणी जगदीश गोडसे, अतुल मतेंसह आता उद्धव निमसेही उमेदवारीच्या शर्यतीत आले आहेत.
देवळाली मतदारसंघातून महायुतीतर्फे राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे विद्यमान आमदार सरोज अहिरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवार गटाला की ठाकरे गटाला याचा फैसला अद्याप होऊ शकलेला नाही. निफाडची जागा ठाकरे गटाला दिल्याने शरद पवार गटाने देवळालीची जागा प्रतिष्ठेची केली आहे. या मतदारसंघातून ठाकरे गटातर्फे योगेश घोलप हे उमेदवारी जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे देवळालीची जागा नेमकी कुणाची यावरून कार्यकर्ते संभ्रमात आहेत.