

येवला : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात अर्ज माघारीच्या दिवशी सुमारे 17 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अॅड. माणिकराव शिंदे यांच्याच सरळ मुकाबला होणार आहे.
नाशिक जिल्हा शिवसेना ठाकरे गटाचे ग्रामीण जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, लासलगावचे ज्येष्ठ नेते जयदत्त होळकर व जरांगे समर्थक युवक नेते बाजार समिती संचालक सचिन आहेर, गोरख पवार या प्रमुख अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत माणिकराव शिंदे यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. एकूण 30 उमेदवारांपैकी 17 जणांनी माघार घेतल्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये 13 उमेदवार राहिले आहेत.
तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मारोतराव पवार यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे यांच्या रायगड या निवासस्थाना जवळ झालेल्या बैठकीत अपक्ष उमेदवारांनी माघार घेत शिंदे यांच्या बरोबर राहण्याचा हा निर्णय झाल्याचे समजते. तालुक्यातील मातब्बर नेत्यांपैकी पवार दराडे हे आता शिंदे यांच्याबरोबर असल्यामुळे भुजबळांना ही निवडणूक तापदायक झाली असून जरांगे फॅक्टरने पेटलेल्या मतदारांना सामोरे जाण्याची तगडे आव्हान भुजबळ यांचे समोर उभे ठाकले आहे.