

येवला : येवला- लासलगाव मतदारसंघात गेल्या 20 वर्षांमध्ये अफाट विकासकामे झाली आहेत. छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या व्हिजनमुळेच हे होऊ शकले. विशेष म्हणजे भुजबळ यांनी अल्पसंख्याकांना विकासाच्या प्रवाहात आणले आहे, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष आणि अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हुसेन शेख यांनी केले.
सलग चारवेळा भुजबळ यांना जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. यंदाही जनता त्यांच्या भक्कम पाठीशी आहे. कोटमगाव देवस्थान असो की, कुठलेही धार्मिक स्थळ भुजबळ यांनी तेथे विकासाची पेरणी केली आहे. येवला- लासलगाव मतदारसंघात गाडीने फिरले, तरी लक्षात येईल की, भुजबळ यांनी किती आणि कोणती कामे केली आहेत. संपूर्ण डायरी भरून जाईल, एवढी विकासकामे झाली आहेत. काही प्रगतिपथावर आहेत, तर काही होणार आहेत. मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न असो की, सर्वधर्मीय पैठणी कामगारांचा, सर्वच घटकांना त्यांनी न्याय दिला आहे, असे शेख म्हणाले. माझ्यासारख्या व्यक्तीला थेट अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदी नेमून मोठी संधी दिली. येवला शहरात भव्य शादीखाना साकारुन भुजबळ यांनी मोठे कार्य केले आहे. सर्वधर्मीय धार्मिक स्थळांचा विकास भुजबळ यांनी केल्याने त्यांच्या पाठीशी सर्वांचा कृपाशीर्वाद आहे, असे शेख म्हणाले.