

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दैवी शक्ती असल्याचे सांगून महिलांचे शारीरिक शोषण करणाऱ्या अशोक खरातचा पाय आणखी खोलात जाणार आहे. खरात प्रकरणात विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू असतानाच, त्याच्यावर आयकर विभाग, धर्मादाय आणि वन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार आहे.
आयकर विभागाने खरातच्या बेनामी संपत्ती आणि उत्पन्नाचे स्स्रोत खोदून काढण्यास सुरुवात केली असून, धर्मादायकडून त्याच्या ट्रस्टमधील गैरव्यवहाराची जंत्री खोदून काढली जाणार आहे. तर तंत्र मंत्रासाठी वन्यजिवांचे अवयव वापरल्याप्रकरणी वनविभाग वनजीव कायद्यांतर्गत खरातवर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे.
खरातने आपल्या दुष्कृत्याने कोट्यवधींची मालमत्ता जमवताना अनेकांना गंडवले आहे. महिलांचे शारीरिक शोषण करण्याबरोबरच त्याने आर्थिक शोषण करीत कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली आहे. या मालमत्ता आणि त्याच्या उत्पन्नाचे स्रोत जाणून घेण्यासाठी आयकर विभागाकडून सखोल तपास केला जात आहे.
सध्या आयकर विभागाकडून त्याच्या मोठ्या रकमेच्या व्यवहाराचे विवरणपत्र तपासले जात आहेत. खरात आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या मालमत्ता त्यांच्या आयकर विवरणपत्रात नमूद केल्या आहेत काय? याची पडताळणी केली जात आहे.
तसेच खरातने या मालमत्ता खरेदी करण्यासाठी कोट्यवधी रुपये कुठून आणले, याचादेखील तपास सुरू आहे. त्याचे अधिकृत उत्पन्नाचे स्रोत, त्याने दाखवलेले उत्पन्न आणि प्रत्यक्ष व्यवहार यात काही तफावत आहे काय? तसेच त्याने मिळवलेल्या रकमांची अधिकृत नोंद आहे काय? याचाही तपास केला जात आहे. त्याच्या बँकेच्या व्यवहारांचीदेखील पडताळणी सुरू आहे.
पैसे पुरवणाऱ्यांवरही तपास यंत्रणांचा डोळा
खरातने कोट्यवधीची माया जमवली असून, हे पैसे त्याने कसे प्राप्त केले याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे. सध्या त्याच्या बँक व्यवहाराची कसून चौकशी केली जात असून, त्याला कोणी पैसे पुरवले याचा शोध घेतला जात आहे. त्यामुळे खरातला पैसे पुरवणाऱ्यांवर तपास यंत्रणेचा डोळा असून, लवकरच आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे.
संयुक्त तपासणी : वन्यजीव संरक्षण कायद्याची टांगती तलवार
खरातने २००९ मध्ये सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे स्थापन केलेल्या श्री शिवनिका संस्थान ट्रस्टच्या व्यवहाराची चौकशी धर्मादाय विभागाकडून केली जाणार आहे. या ट्रस्टमधील व्यवहारात मोठा गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप यापूर्वीच ट्रस्टवरील काही पदाधिकाऱ्यांनी केला होता. या आरोपानंतर चार पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामेदेखील दिले होते. भक्तांकडून येणाऱ्या देणग्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला जात असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला होता.
नेमका याचाच तपास धर्मादाय विभागाकडून केला जाणार आहे. भक्तांकडून प्राप्त देणग्यांच्या हिशेबाची पडताळणी केली जाणार आहे. तसेच ट्रस्टचे नियमित ऑडिट केले गेले काय? याचीदेखील पडताळी केली जाणार आहे. खरातकडून तांत्रिक विधीसाठी काही वन्य प्राण्यांच्या अवयवांचा वापर केला जात असल्याने, यादृष्टीने वन विभागाकडून चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे खरातचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.