

राज्यासह देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणाला आता नवे आणि गंभीर वळण मिळाले आहे. महिला लैंगिक शोषण व फसवणूक प्रकरणांमुळे आधीच चर्चेत असलेल्या खरातवर २००७ मधील पत्रकार बाळू तुपे यांच्या हत्येशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळात केला आहे.
या आरोपांमुळे जवळपास १८ वर्षांपूर्वीचे हे प्रकरण पुन्हा ऐरणीवर आले असून, त्याची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. आव्हाड यांच्या मते, पत्रकार बाळू तुपे यांनी २००७ साली खरातच्या भोंदूगिरी, फसवणूक आणि कथित अवैध व्यवहारांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला होता.
त्यानंतर त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला आणि काही काळातच त्यांची निघृण हत्या झाली. त्या वेळी हे प्रकरण स्थानिक स्तरावर गाजले असले तरी, राजकीय आणि प्रशासकीय दबावामुळे तपासाला अपेक्षित गती मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात काही पोलिस अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. खरातला वाचवण्यासाठी आर्थिक व्यवहार झाले आणि तपासावर प्रभाव टाकण्यात आल्याचे आव्हाड यांनी सूचित केले आहे. या प्रकरणामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि गुन्हेगारी-सत्ता संगनमताचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.