

भोंद खरातच्या प्रभावाचा विस्तार केवळ धार्मिक क्षेत्रापुरता मर्यादित नसून, तो थेट सत्तेच्या केंद्रापर्यंत पोहोचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात मंत्रालयाजवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये खरातसाठी कायमस्वरूपी खोल्या बुक करून ठेवल्याची माहिती समोर येत आहे.
या ठिकाणी खरात व त्याचे चेले नेहमी मुक्काम करत असत आणि मंत्रालयात येणाऱ्या अनेकांची त्याच्याशी तेथे भेट होत असे. मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान 'वर्षा' येथेही खरातला मुक्त प्रवेश असल्याची चर्चा होती.
शिंदेंवरील संकटे दूर करण्यासाठी त्याच्या पुढाकाराने 'वर्षा'वर विशेष पूजा आयोजित केल्याच्या चर्चांनीही जोर धरला होता. सत्तेतील अस्थिरतेच्या काळात राजकीय निर्णयांमध्येही खरातच्या सल्ल्याचा अप्रत्यक्ष प्रभाव असल्याचे त्याचे अनुयायी सांगत होते.
यानंतरही विविध राजकीय घडामोडींमध्ये त्याचा वावर कायम राहिल्याचे बोलले जाते. सत्तेतील बदल, नेत्यांमधील स्पर्धा आणि राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर खरातचा 'भाव' वाढत गेला. काही भक्तांच्या मते, त्याच्या सल्ल्यानुसार केलेल्या पूजाविधींमुळे राजकीय यश मिळाल्याची भावना निर्माण झाली होती. अनेक राजकारणी, मंत्री यांचे खरातशी हळूहळू घनिष्ठ संबंध निर्माण झाले.
पुण्यातील एका माजी भक्ताशी झालेल्या वादातूनच खरातचे अनेक कारनामे बाहेर येऊ लागल्याची चर्चा आहे. आर्थिक व्यवहारांतील मतभेदांमुळे संबंध बिघडले आणि त्यातूनच त्याच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश होण्यास सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.