

वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरधाव व बेदरकारपणे वाहन चालवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या दोन आयशर वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या दोन आयशर चालकांना पोलिसांनी पकडून शहरामध्ये धींड काढून बेदरकार वाहनचालकांना इशारा दिला.
याबाबत तिसगाव (ता. दिंडोरी) येथील शेतकरी अभिजीत पांडुरंग भालेराव (वय ४९) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ६.५० वाजताच्या सुमारास कन्हैया ढाबा ते मावडी फाटा दरम्यान (ता. दिंडोरी, जि. नाशिक) हा प्रकार घडला. फिर्यादी हे आपल्या स्कोडा कारने तिसगाव येथून पिंपळगाव बाजूकडून वणीकडे जात असताना समोरून येणाऱ्या आयशर वाहन क्रमांक एमएच १५ जेसी ३१११ व एमएच १५ एचएक्स ३१११ या वाहनांचे चालक रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात, नागमोडी व हयगयीने वाहन चालवत होते. त्यामुळे इतर वाहनधारकांच्या जीवितास धोका निर्माण झाला. थांबण्याचा इशारा दिला असता चालकांनी न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी आयशर वाहन क्रमांक एमएच १५ जेसी ३१११ चा चालक ऋषीकेश एकनाथ बर्डे (रा. देवगाव, ता. निफाड) तसेच दुसऱ्या आयशर वाहन क्रमांक एमएच १५ एचएक्स ३१११ चा चालक सचिन (पूर्ण नाव माहीत नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर वणी पोलिसांनी दोन्ही चालकांची धिंड काढून बेदरकार वाहनचालकांना कडक संदेश दिला.
सदर गुन्ह्याचा तपास वणी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, पोलीस हवालदार पवार हे दाखल व तपास अंमलदार म्हणून काम पाहत आहेत. वणी पोलिसांकडून अशा प्रकारच्या बेदरकार वाहनचालकांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.