डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात बंदोबस्त; जाणून घ्या वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग कोणते
नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात ठिकठिकाणी देखावे उभारले असून, जुने नाशिक व नाशिक रोड भागात मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले असून, आवश्यकतेनुसार वाहतूक मार्गातही बदल केले आहेत. शहरात सुमारे १ हजार ६०० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात राहणार असून गर्दीवर ड्रोन, सीसीटीव्हींचीही नजर राहणार आहे.
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील सुमारे १३० सार्वजनिक मंडळांनी कार्यक्रमांसाठी पोलिसांकडे पूर्वपरवानगीसाठी अर्ज केले आहेत. त्यानुसार पोलिसांनी नियमांचे पालन करणाऱ्या मंडळांना परवानगी दिल्या आहेत. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांनी वाहतूक मार्गातही बदल केले आहेत.
जुने नाशिक मिरवणूक मार्ग
राजवाडा (भद्रकाली) - वाकडी बारव - महात्मा फुले मार्केट - भद्रकाली मार्केट - बादशाही कॉर्नर - गाडगे महाराज पुतळा - मेनरोड - धुमाळ पॉइंट - रविवार कारंजा- सांगली बँक सिग्नल - नेहरू गार्डन - शालिमार - शिवाजी रोड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (समारोप)
मिरवणूक मार्गावरील पर्यायी मार्ग
वाहनधारकांनी चौक मंडईकडून सारडा सर्कलमार्गे जावे. फुले मार्केट ते अमरधाम, टाळकुटेश्वर मंदिर ते पंचवटीकडे वाहने जातील.
दिंडोरी नाका, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा, सांगली बँक मार्गे शालिमार, सीबीएसकडे जाणाऱ्या बसेस, अन्य वाहने दिंडोरी नाक्यावरून पेठ फाटा, मखमलाबाद नाका, रामवाडी पूल, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, सीबीएस, मोडक सिग्नल, गडकरी सिग्नलमार्गे सिडको, नाशिक रोडकडे जातील-येतील.
नाशिक रोड मिरवणूक मार्ग
बिटको चौक - क्वॉलिटी स्विट - मित्रमेळा ऑफिससमोर - छत्रपती शिवाजी महाराज पुतळा - देवी चौक - जव्हार मार्केट - डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (समारोप)
प्रवेश बंद मार्ग
उड्डाणपुलावरून खाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे येणारा मार्ग.
दत्त मंदिरकडून बिटको सिग्नलकडून येणारा मार्ग
रेल्वे स्टेशनकडून बिटकोकडे येणारा मार्ग.
नाशिकरोड पर्यायी मार्ग
सिन्नर फाट्याकडून येताना पुलाखालून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बिटको चौक, रेल्वे स्टेशनकडे जाणारी वाहतूक सिन्नर फाटा येथून उड्डाणपुलावरून दत्त मंदिर चौक, दत्त मंदिर रोडने सुराणा हॉस्पिटल, सत्कार टी पॉइंट - रिपोर्टे कॉर्नर येथून रेल्वे स्टेशन.
रेलवे स्टेशन येथून सुभाष रोड मार्गे परत दत्त मंदिर सिग्नल मार्गे जातील-येतील.
नाशिककडून पुण्याकडे जाणारी वाहतूक दत्तमंदिर सिग्नलवरून वीर सावरकर पुलावरून सिन्नर फाट्याकडे जातील-येतील.
नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरातील बसेस दत्तमंदिर सिग्नलमार्गे सुभाष रोडवरून जातील. सीबीएसकडे येणारी वाहने नाशिक रोड न्यायालयासमोरून सरळ आर्टिलरी रोडमार्गे जयभावनी चौकातून उजवीकडे वळून उपनगर सिग्नलमार्गे पुढे जातील.
पाथर्डी फाटा - प्रवेश बंद मार्ग
गरवारे पॉइंट ते पाथर्डी फाटा, पाथर्डी सर्कल, कलानगर, फेम सिग्नल रस्त्यावर दोन्ही बाजूने, तसेच पाथर्डी गाव ते पाथर्डी फाटा मार्गे डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोरून अंबड-सातपूर लिंक रोडवर अवजड वाहनांना मनाई. तर, नम्रता पेट्रोलपंप ते पाथर्डी फाटा रस्त्यावर दोन्ही बाजूने सर्व वाहनांना मनाई असेल.
पाथर्डी फाटा - पर्यायी मार्ग
गरवारे पॉइंटपूर्वीच्या ओव्हरब्रीजमार्गे द्वारका, फेम सिग्नल ते द्वारकावरून ओव्हरब्रीजमार्गे गरवारे, पाथर्डी गाव ते सातपूर-अंबडकडे जाण्यासाठी राणेनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून मार्गस्थ. तसेच अंबडकडून येणारी वाहने पोलिस स्टेशनमार्गे महामार्गावर येतील.

