

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नीळकंठेश्वर महादेव मंदिर परिसर भूमिगत मलनिस्सारण वाहिनी टाकण्याच्या प्रस्तावित कामाला पुरातत्व विभागाने आक्षेप घेतला आहे. राज्य संरक्षित स्मारकाच्या परिसर उत्खनन केल्यास मंदिराच्या मूळ बांधकामासह पायाभूत संरचनेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पुरातत्व विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय कोणतेही काम सुरू करू नये, असे स्पष्ट निर्देश महापालिकेला देण्यात आले आहेत.
नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण यांत्रिकी विभागामार्फत नीळकंठेश्वर महादेव मंदिर परिसर भूमिगत मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम प्रस्तावित आहे. मात्र, हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारितील राज्य संरक्षित स्मारक असल्याने परिसर होणाऱ्या उत्खननाबाबत विभागाने सावध भूमिका घेतली आहे.
उत्खननामुळे मंदिराच्या पायाभूत संरचनेला, मूळ बांधकामास तसेच स्मारकाच्या स्थैर्याला बाधा पोहोचण्याची शक्यता विभागाने व्यक्त केली. यासंदर्भात पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या नाशिक विभागीय कार्यालयाने ३ नोव्हेंबरला महापालिकेला पत्र पाठवले आहे.
प्रस्तावित कामाचे स्वरूप, मलनिस्सारण वाहिनीचा मार्ग, उत्खननाची खोली व रुंदी आणि कामासाठी अवलंबील जाणाऱ्या कार्यपद्धतीचा तपशील पुरातत्व विभागाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विभागाची पूर्वपरवानगी मिळण्यापूर्वी स्मारक परिसरात कोणत्याही प्रकारचे उत्खनन अथवा संबंधित काम करू नये, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. कामादरम्यान मंदिराच्या सुरक्षेतेला बाधा पोहोचणार नाही, यासाठी आवश्यक तांत्रिक खबरदारी घेण्याची जबाबदारीही संबंधित यंत्रणेवर निश्चित करण्यात आली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध मूलभूत सुविधांची कामे मार्गी लावण्याची लगबग सुरू असताना ऐतिहासिक वारसाच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महापालिकेला आता मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू करण्यापूर्वी पुरातत्व विभागाची परवानगी मिळवावी लागणार आहे.