नाशिक : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत चुकीच्या पद्धतीने प्लास्टिक विरोधी कारवाई केली जात असून, व्यापाऱ्यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. नवीन नाशिक धान्य किराणा व्यापारी संघटनेच्या वतीने याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाने संचालक डॉ. आवेश पलोड यांना निवेदन दिले असून, कारवाई थांबविण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले, संघटनेतर्फे 'सिंगल युज प्लास्टिक वापरू नये, त्यास बंदी आहे', असे प्रबोधन विक्रेत्यांमध्ये नेहमी केले जाते. त्यामुळे विक्रेत्यांकडून प्लास्टिकचा वापर फारसा केला जात नाही. मात्र, अशातही मनपाचे काही कर्मचारी एकत्रित येऊन दुकानात घुसून दमदाटी करीत आहेत. पाच ते दहा हजार रुपये दंड वसूल करत आहेत. या कारवाईमुळे दुकानदार धास्तावले असून, आर्थिक कोंडीत सापडले आहेत. दुकानदार अगोदरच सध्याच्या परिस्थितीत घाबरलेला आहे. त्यात अशा स्वरूपाची कारवाई म्हणजे किराणा दुकानदारांवर अन्याय आहे. या सर्व स्थितीचा विचार करून मनपा व प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलिस विभागाने कारवाई थांबवावी, अशी मागणी केली आहे. नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांच्यासह नवीन नाशिक संघटनेचे अध्यक्ष नाना जाधव, वरिष्ठ उपाध्यक्ष भास्कर पवार, सचिव निवृत्ती शिरोडे आदींच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
किराणा व्यवसाय करणारे दुकानदार हँडल कॅरिबॅग वापरत नाहीत. तसेच किराणा मोठ्या बॅगेत एकत्रित पॅक करून देत नाहीत. परंतु, किराणा दुकानात येणारा माल हा प्लास्टिक बॅगेत पॅक होऊन आलेला असतो. किराणा व्यवसाय करणाऱ्यांना कोणती पिशवी वापरावी, ती कशी वापरावी, ती पिशवी कुठून घेतली पाहिजे याचे कुठलेही ज्ञान नसल्याचा अजब दावा संघटनेने केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
सध्या मनपाकडून राबविलेल्या जात असलेल्या मोहिमेत १२० मायक्रॉनपर्यंतच्या वापर होत असलेल्या प्लास्टिकविरोधी कारवाई केली जात आहे. याबाबत कुठलाही शासन निर्णय वा नियम नाही. असे असताना कारवाई कशाच्या आधारे होत आहे, असा सवालही संघटनेचे प्रफुल्ल संचेती यांनी उपस्थित केला.