

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अंगणवाड्यांमधील चिमुकले आणि मातांना दिला जाणारा घरपोच पोषण आहार (टीएचआर) आता अधिक पौष्टिक आणि चविष्ट होणार आहे. महिला व बालविकास विभागाने पोषण आहाराच्या मेनूमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले असून, पारंपरिक खिचडीची चव वाढवण्यासाठी आता स्वतंत्र मसाल्याचे पाकीट दिले जाणार आहे.
तसेच यात 'व्हेज पुलाव' आणि 'बहुधान्य पौष्टिक पफ' यांसारख्या नव्या, रुचकर पदार्थांची मेजवानी लाभार्थ्यांना घरपोच मिळणार आहे. या आहारामुळे बालके, गरोदर महिला, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींना केवळ पोटभर आहार नव्हे, तर आवश्यक पोषणमूल्ये असलेला संतुलित आहार मिळण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, येत्या नोव्हेंबर-डिसेंबर २०२६ पासून सुधारित पाककृतींची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे. कुपोषणाला आळा घालणे, विविध पोषकतत्त्वांचा समावेश करणे आणि गुणवत्तापूर्ण पोषण उपलब्ध करून देणे, या उद्देशाने महिला व बालविकास विभागाने घरपोच पोषण आहार (टीएचआर) योजनेत महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
सहा महिने ते सहा वर्षांपर्यंतची बालके, गरोदर महिला, स्तनदा माता तसेच किशोरवयीन मुली या योजनेच्या प्रमुख लाभार्थी असतात. या गटांना आवश्यक पोषण मिळावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. कुपोषणमुक्तीचा उद्देशही या योजनेतून साध्य करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
बदल करण्यात आलेल्या आहारात प्रथमच व्हेज पुलाव आणि बहुधान्य पौष्टिक पफचा समावेश करण्यात आला आहे. विविध धान्यांमुळे पोषणमूल्य वाढण्यासोबतच मुलांना आहार अधिक आवडीने खाता येईल, असा विभागाचा विश्वास आहे. यापूर्वी खिचडीची चव एकसुरी असल्याच्या तक्रारी येत होत्या. आता स्वतंत्र मसाल्याचे पाकीट दिल्यामुळे खिचडी अधिक रुचकर बनविता येणार असून, आहार वाया जाण्याचे प्रमाणही कमी होण्याची शक्यता आहे.
सुधारित पोषण आहाराची अंमलबजावणी नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२६ पासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक नियोजन आणि पुरवठा व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
यापूर्वी दिले जाणारे पौष्टिक मिश्रण आणि इतर आवश्यक पोषण आहारातील प्रमुख पदार्थ कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे जुन्या आणि नव्या पदार्थांचा समतोल साधण्यात आला आहे. या नव्या बदलाची अंमलबजावणी होत आहे.