

नाशिक : दिलीप सूर्यवंशी
सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत आनंदाच्या शिध्याचे वाटप करण्यात येते. सन 2024 मध्ये अंत्योदय कुटुंब आणि प्राधान्य कुटुंबातील तसेच शेतकरी अवर्षणग्रस्त भागात 99.64 टक्के अर्थात 1 कोटी 55 लाख 47 हजार 337 पात्र शिधापत्रिकाधारकांना गौरी-गणपती उत्सवानिमित्त रेशन दुकानांमार्फत आनंदाच्या शिध्याचे वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांना त्यांच्या लाभार्थी कार्डावरून शिधा दिला गेला.
आनंदाचा शिधा ही योजना महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. गरीब व गरजू कुटुंबांना सणासुदीच्या काळात अन्नधान्याचा पुरवठा करून त्यांना आर्थिक मदत आणि सणाचा आनंद घेता यावा यासाठी मदत करणे हा योजनेचा उद्देश आहे.
योजनेंतर्गत एपीएल (केशरी) शेतकरी शिधापत्रिकाधारकांना ई- पॉस प्रणालीद्वारे 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या 4 शिधाजिन्नसांचा समावेश असलेल्या विशेष शिधाजिन्नस संचांचे वितरण रुपये 100/- प्रतिसंच या दराने सर्वप्रथम 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त करण्यात आले. त्यानंतर सन 2023 मध्ये शासन निर्णयानुसार गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी-गणपती आणि दिवाळी सणानिमित्त आनंदाच्या शिध्याचे वाटप करण्यात आले, तर 2024 मध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तसेच गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी 1 किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व 1 लिटर सोयाबीन तेल या 4 शिधाजिन्नसांचा समावेश असलेल्या शिधाजिन्नस संचाचे- आनंदाच्या शिध्याचे वाटप करण्यात आले.