

सिडको (नाशिक) : शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुद्देशीय संघटना व बीएमए ग्रुपतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्या पुर्वसंध्येला रविवारी (दि. १३) सायंकाळी ४ वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह भाभानगर मुंबईनाका येथुन भव्य महारॅली काढण्यात आली. या रॅलीत अडीच हजार बांधव सुट, बुट, टायमध्ये सहभागी झाले होते. नाशकात प्रथमच अशा प्रकारे महारॅली निघाल्याने तिने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
बीएमए ग्रुपचे संस्थापक व प्रसिद्ध उद्योजक मोहन अढांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह भाभानगर मुंबईनाका येथुन दुपारी चारला महारॅली काढण्यात आली. रॅलीचा समारोप शालीमार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे झाला. रॅलीत समाज बांधवांकडे हातात फलक होते. नाशिक शहरात प्रथमच सुट बुटात समाज बांधवांनी रॅली काढल्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. सायकांळी सात वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे चेतनकुमार चोपडे व संच यांचा तुझ्या पाऊलखुणा भिमराया हा बुद्धभिम गितांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रम यशस्वीसाठी अढांगळे व शासकीय अधिकारी व कर्मचारी बहुद्देशीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदिप पोळ व भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले होते.
समाजभूषण मोहन अडांगळे नेहमीच समाजासाठी वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करतात. अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून ते समाजापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचे व भगवान गौतम बुद्धांचे विचार पोहोचविण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. बाबासाहेब म्हणायचे मी, एक ना एक दिवस माझ्या समाजाला सुटा बुटात टाय आणि कोटात आणल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांचे हे ब्रीदवाक्य तंतोतंत खरे करण्यासाठी येथील शासकीय अधिकारी कर्मचारी बहुउद्देशीय संघटना व बीएमए ग्रुपच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती मोहन अढांगळे यांनी यावेळी दिली.