

नाशिक : सोने दरांनी लाखांचा टप्पा पार केल्याने, अक्षयतृतीया मुहूर्तावर खरेदीला काहीसा ब्रेक लागेल, अशी भिती व्यक्त केली जात असतानाच, अक्षयतृतीया अगोदरच सोने दर लाखांच्या आत आल्याने, मुहूर्तावर खरेदी जोरात केली जाईल, अशी अपेक्षा सराफ व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे. २४ कॅरेट सोने जीएसटीसह ९९ हजारांवर आले असून, २२ कॅरेट दर प्रति तोळा ९१ हजारांवर असल्याने खरेदीचा मुहूर्त साधला जाण्याची शक्यता आहे.
असे आहेत दर
२४ कॅरेट - प्रति तोळा - ९९ हजार
२४ कॅरेट - प्रति तोळा - ९१ हजार १०० रु.
चांदी - प्रति किलो - एक लाख ५०० रु.
(सर्व दर जीएसटीसह)
मागील काही काळापासून सोने दरात झपाट्याने वाढ होत असून, दरवाढीचा वेग ३८ टक्क्यांवर आहे. त्यातच गेल्या आठवड्यात सोने दरांनी एक लाखांचा टप्पा पार केल्याने, अक्षयतृतीया मुहूर्तावर खरेदीचा वेग मंदावेल अशी भिती व्यक्त केली जात होती. मात्र, दरवाढीचा खरेदीवर कुठलाही परिणाम झाला नसल्याचे सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे. उलट सोने दरात होत असलेली वाढ बघता, गुंतवणूकदार सक्रीय झाले असून, मागील आठवड्यांपासूनच त्यांच्याकडून बुकींगचा धडाका सुरू आहे. त्यातच मुहूर्ताअगोदर सोने दर लाखांच्या खाली आल्याने, खरेदीचा उत्साह वाढण्याची सराफ व्यावसायिकांना अपेक्षा आहे.
अक्षय तृतीया हा सण भारतात समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. या दिवशी सोने खरेदी करणे एक पारंपरिक पद्धत आहे, जी पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. हिंदू धर्मात सोने हे श्रीमहालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, या दिवशी सोने खरेदी केल्याने घरात संपत्तीचा प्रवाह कायम राहील, अशी धारणा असल्याने मुहूर्तावर जोरात खरेदी केली जाईल, अशी व्यावसायिकांना अपेक्षा आहे.
बुधवार, दि. ३० एप्रिल २०२५ रोजी, सकाळी ५. ४१ ते दुपारी २.१२ वाजेपर्यंत. या दिवशी शुभ दुर्लभ संयोगावर सुमारे ८ तास ३० मिनिटे सोने खरेदीसाठी फायदेशीर वेळ आहे.
अक्षयतृतीया मुहूर्तावर सराफ व्यावसायिकांनी ग्राहकांसाठी ऑफर्स उपलब्ध करून दिल्या आहेत. मजुरीवर सुट तसेच सोने खरेदीवर चांदी फ्री, लकी ड्रॉमधून चारचाकी, दुचाकी तसेच फायनान्सचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाइन बुकींगच्या माध्यमातून घरपोच डिलिव्हरीचीही सुविधा व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिल्याने, ग्राहकांना घरबसल्या खरेदी करणे शक्य होत आहे.
यंदाच्या मे महिन्यात सर्वाधिक १५ लग्नतिथी आहेत. महिन्याच्या पहिल्याच तारखेपासून ते ३० मेपर्यंत या तिथी असल्याने, यजमानांकडून अक्षयतृतीया मुहूर्तावर दागिने खरेदीचा मुहूर्त साधला जाण्याची शक्यता आहे. त्यात सोने दर लाखांच्या आत आल्याने, खरेदीसाठी यजमानमंडळींकडून घाई केली जात आहे.
अक्षयतृतीया मुहूर्तावर सोने-चांदी खरेदीबरोबरच वाहने तसेच घरे खरेदीचाही मुहूर्त साधला जात असल्याने ऑटोमोबाइल आणि रियल इस्टेट क्षेत्रात तेजीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. मागील आठवडाभरापासून साइट व्हिजिट वाढल्या असून, बुकींगचा धडाका सुरू आहे. तर अनेकांनी चारचाकी, दुचाकी बुक करून मुहूर्तावर डिलिव्हरी घेण्याचे नियोजन केले आहे. या व्यतिरिक्त होम अप्लायसेंस बाजार तसेच मोबाइल बाजारात तेजीचे वातावरण आहे. मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदीचा अनेकांचा मानस आहे.
अक्षयतृतीया मुहूर्त मानाचा असल्याने, या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. वाढते दर लक्षात घेता, आठवडाभरापासूनच बुकींगचा धडाका सुरू आहे. त्यामुळे मुहूर्तावर चांगला प्रतिसाद मिळेल, याची खात्री आहे.
गिरीष नवसे, अध्यक्ष, सराफ असोसिएशन, नाशिक.