

मालेगाव (नाशिक) : हिंदू संस्कृतीत अनेक सण साजरे केले जातात. त्यापैकीच एक आखाजी अर्थात अक्षयतृतीया. आखाजीला दाभाडीत माहेरवाशिणीचे रंगणारे दगडफेकीचे युद्ध जिल्ह्यात प्रसिद्ध होते. परंतु ही परंपरा काळाच्या ओघात खंडित झाल्याने आखाजीचा सण हिरमुसल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
चैत्री पौर्णिमेला गौराईची स्थापना झाल्यापासून विसर्जनापर्यंत रात्रंदिवस झोक्यावर बसून माहेरवाशीण शंकर- पार्वतीच्या प्रेम जीवनावर गाणी म्हणत. आखाजीच्या दिवशी माहेरवाशीण मुली दोध्याड- गिरणा नदी काठावरील आमराईत पत्री घ्यायला जात. प्रत्येकीच्या डोक्यावर तांब्या त्यात पाणी, आंब्याची पत्री व कैर्या असत. त्यावेळी त्या एकमेकींना लडिवाळपणे चिडवणारी प्रेमाची गाणी म्हणत. या सर्व माहेरवाशिणी दोध्याड नदीच्या काठावरील महादेव मंदिरात जमत. महादेवाच्या पिंडीवर जल व पत्री वाहिले जात. या ठिकाणाहून त्या गटा गटांनी गाणी म्हणत घरी परतत. असे चित्र डोळ्यासमोरून तरळून गेले म्हणजे आखाजी सणाच्या जुन्या आठवणींचा बांध फुटाय चा. आखाजी म्हणजे दगडफेकीचे युद्ध आलेच. हे युद्ध बंद झाल्यापासून दाभाडीतील आखाजी सणाची शोभाच गेली. आखाजी आहे किं वा नाही असा संभ्रम आता दाभाडीवासीयांना पडतो आहे. गिरणा- दोध्याड नद्या केव्हाच आटल्या आहेत. आंब्याची झाडे दुर्मीळ झाली आहेत. गौराईची स्थापना नाही की, घरोघरी दिसणारे झोके नाहीत. ना माहेरवाशीणींची गाणी, ना उत्साह, ना माणुसकी अशा पार्श्वभूमीवर आखाजीचा सण येऊन न आल्या सारखाच असल्याच्या प्रतिक्रिया ज्येष्ठ महिलांकडून व्यक्त केल्या. आता केवळ आखाजीच्या आठवणीच शिल्लक राहिल्या आहेत.
अक्षयतृतीयेलाच कसमादे पट्टा व खानदेशात आखाजी संबोधतात. हा सण विशेषतः महिलांचा आहे. सणानिमित्त सासुरवाशीण महिला माहेरी आल्यावर शिवारातील डेरेदार झाडांना झोके बांधून त्यांचा खेळ रंगायचा. यावेळी ‘कैरी तुटनी खडक फुटना, झुळझुळ पाणी वहाय व झुळझुळ पाणी वहाय तठे, रतन धोबी धोय व’ हे गीत त्याप्रमाणेच पार्वतीला येण्याचे साकडे घालणारे ‘कसाना भरू मी ताट, ताट मनी मालनले, हळद कुंकूना भरू मी ताट, ताट मनी गवरायीले’ ही गाणी तरुणींकडून नदी किनारी हमखास ऐकायला मिळत. काळाच्या ओघात आमराया गेल्या, त्यासोबतच आजोळी रंगणारा मेळादेखील इतिहासजमा झाला आहे.