नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरगाणा येथे विविध विकासकामांचे उद्घाटन शुक्रवारी (दि. २) पार पडले. या बैठकीला राज्यातील राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. मात्र, वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दांडी मारली. मंत्री भुजबळांच्या या अनुपस्थितीने कार्यक्रमात अनेक राजकीय चर्चांना उधाण आले होते. याबाबत मंत्री भुजबळांनी तब्येत बरी नसल्याने आपण उपस्थित राहणार नसल्याचे अजित पवारांना सांगितले असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकांनंतर आता विधानसभांच्या निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी राज्यात दौरे सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे सुरगाणा दौऱ्यावर होते. यावेळी पक्षातील तसेच शासनातील अनेक नेते, मंत्री यांची उपस्थिती होती. मात्र या दौऱ्यामध्ये भुजबळ यांचा समावेश नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. काही दिवसांपूर्वी राज्यसभेच्या उमेदवारीवरून भुजबळ नाराज असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. तसेच मराठा व ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तापला आहे. त्यावरून भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मतभेद असल्याची चर्चांची या अनुपस्थितीला किनार आहे का, असे बोलले जात होते.
मंत्री भुजबळ यांनीच या अनुपस्थिती प्रकरणावर पडदा टाकला. सध्या प्रत्येक जण आपापल्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करत आहे. एकाच वेळी सर्व नेते एकाच ठिकाणी जाऊ शकतील असे नाही. त्याचबरोबर माझी तब्येत गेल्या काही दिवसांपासून ठीक नाही. काल मी खूप त्रासदायक प्रवास केला आहे. त्यामुळे मी आज अजित पवारांबरोबर नसेन. याबाबत माझी अजित पवारांबरोबर चर्चा झाली असल्याचे सांगितले आहे. यावेळी पवारांनी १० तारखेला आपण एकत्र तुमच्या मतदारसंघात जाऊ, असेदेखील सांगितले असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
गेले १५ दिवस मी मतदारसंघात नव्हतो. मला आता माझ्या मतदारसंघात जायचे आहे. तसेच येत्या १० ऑगस्ट रोजी अजित पवार पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. तेव्हा ते माझ्या येवला मतदारसंघातही येतील. तेव्हा मी त्यांच्याबरोबर असेन असेही भुजबळ यांनी सांगितले.