

सिडको ( नाशिक ) : उद्योग जगतात भरीव कार्य करून भविष्याचा वेध घेणाऱ्या तसेच नवोदित उद्योजकांच्या नाविन्यपूर्ण कलाविष्काराला प्रोत्साहन देणाऱ्या अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) तर्फे त्रंबक रोडवरील ठक्कर डोम येथे आयोजित आयमा इंडेक्स 2025 हे चार दिवसांचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन (औद्योगिक महाकुंभ) आजपासून (दि. २८) सुरु होत असल्याची माहिती प्रदर्शनाचे चेअरमन वरूण तलवार आणि संघटनेचे विद्यमान अध्यक्ष ललित बूब यांनी केले.
प्रदर्शनाचे उद्घाटन प्रजासत्ताक दक्षिण आफ्रिकेचे भारतातील उच्चायुक्त डॉ. अनिल सुकलाल आणि उद्योग खात्याचे प्रधान सचिव पी. अन्बलगन तसेच उद्योग आयुक्त( विकास) दीपेंद्रसिंह कुशवाह, विभागीय आयुक्त प्रविण गेडाम, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकार पी. वेलारासू, एचएएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी आणि दीपक बिल्डर्सचे अध्यक्ष दीपक चंदे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ३२ हजार स्क्वेअर फुट इतक्या विस्तीर्ण जागेत हे प्रदर्शन विस्तारले आहे. पर्यावरणपूरक आणि नाविन्यपूर्ण असे ३५० वातानुकुलित स्टॉल्स, भव्य ड्रोन शो, एआय तंत्राचा अवलंब, इलेक्ट्रिकल व्हेईकलसाठी स्वतंत्र विभाग ही या प्रदर्शनाची खास वैशिष्ट्ये आहेत.
उद्योगक्षेत्राशी संबंधित सर्व बडे अधिकारी चारही दिवस प्रदर्शनस्थळी हजर राहून उद्योजक आणि विशेषतः नवोदितांना मार्गदर्शन करणार आहेत. वित्तसहाय्य आणि सबसिडीबाबतही त्यांना बहुमूल्य माहिती यावेळी उपलब्ध होणार आहे. कोविडच्या काळात दीर्घकाळ उद्योग बंद राहिल्याने अनेक छोट्यामोठ्या उद्योजकांचे कंबरडे मोडले गेले आहे. त्यांच्याबाबतही प्रदर्शनात अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी आयमा प्रयत्न करणार आहे. प्रदर्शनात विविध विषयांवर चर्चासत्र आणि परिसंवादही होणार असल्याचे तलवार आणि बूब यांनी सांगितले.
प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, सरचिटणीस प्रमोद वाघ, डीओपीपी चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, आयपीपी निखिल पांचाळ, सचिव योगिता आहेर, हर्षद बेळे, कोषाध्यक्ष गोविंद झा यांच्यासह सर्व कार्यकारणी सदस्य प्रयत्नशील आहेत.
आयमाचे सातवे प्रदर्शन
गुंतवणुकीला चालना मिळण्याच्या उद्देशाने 2005 पासून आयमातर्फे दर तीन वर्षांनी आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन भरविले जाते. यंदाचे हे सातवे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन आहे. आयमाचे जिल्ह्यात 2500 हून अधिक सदस्य असून जिल्ह्यात 16000 इंडस्ट्रीज आहेत. बीटुबी अंतर्गत उद्योजकांना उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देण्याचे काम संघटना यशस्वीपणे करीत आहे. उद्योजकांची अद्ययावत अशी डिरेक्टरीही आयमातर्फे दरवर्षी प्रकाशित केली जाते.
आजचे कार्यक्रम असे...
दुपारी 2 वाजता-नाविन्यता आणि व्यापाराच्या संधी: ऋषभ इन्स्ट्रुमेंटचे नरेंद्र गोलिया यांचे मार्गदर्शन
दुपारी 3 वाजता - सोमालियातील लेसोथो यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाशी सुसंवाद
माझगाव डॉकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे
शनिवारी विक्रेत्यांसाठी खास मार्गदर्शन
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचा (एमडीएल) सहभाग हे खास वैशिष्ट्य असून शनिवारी (दि. २९) सकाळच्या सत्रात एमडीएलचे महाव्यवस्थापक हरेराम सिंग आणि मुख्य व्यवस्थापक दत्तात्रय सावंत हे विक्रेते, भागधारक आणि पुरवठादारांना मार्गदर्शन आणि सादरीकरण करणार आहेत. एमडीएल ही नौदलासाठी जहाज आणि पाणबुडी तयार करणारी कंपनी त्यांच्या पुरवठा साखळीत असेंब्ली, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक घटक, यांत्रिक घटक आणि प्रणाली, यंत्रसामग्री, उचल उपकरणे, पाईपिंग आणि विविध उपयुक्तता सेवांचा विस्तृत समावेश आहे.