Ghost Viral Video
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आराई गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून भूताची अफवा पसरल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका भीतीदायक व्हिडिओ आणि फोटोंमुळे गावातील नागरिक इतके घाबरले होते की, पोलिसांच्या मदतीने अख्खे गाव रात्रभर जागून पहारा देऊ लागले होते. मात्र, तपासाअंती 'एआय' (AI) चा वापर करून भूताचे व्हिडिओ केले असल्याचे समोर आले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेले भूताचे फोटो आणि व्हिडिओ जुने असून ते एआयच्या मदतीने तयार केलेले आहेत. गावाच्या हद्दीतील मोकळ्या जागा आणि निर्मनुष्य भागात हे भूत दिसत असल्याचा खोटा संदेश पसरवण्यात आला होता, ज्यामुळे ग्रामस्थांनी आळीपाळीने गस्त घालण्यास सुरुवात केली होती. हा सर्व प्रकार एखाद्या चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे भासत होता.
या प्रकरणाची दखल घेत पोलीस प्रशासनाने आणि गावातील तरुणांनी रात्रीची गस्त घातली आणि गावात कुठेही भूत नसल्याचा विश्वास नागरिकांना दिला. पोलिसांनी दोन दिवस गावात शोध मोहीम राबवली असता अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी 'तंटामुक्त समिती'ची बैठक घेऊन अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पोलिसांनी तपास केला असता हा व्हायरल फोटो २०२० मधील असून तो जुना असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. हा सर्व प्रकार खोटा असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, कोणीतरी खोडसाळपणाने इंटरनेटवर उपलब्ध असलेले जुने फोटो एआयच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून व्हायरल केले आहेत. जर कोणी भूत असल्याचा दावा सिद्ध करून दाखवला, तर समितीकडून त्याला २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले आहे.