

इगतपुरी (नाशिक ) : जत तालुक्यातील दहिवली येथून देवदर्शनासाठी शेगावला जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरचा इगतपुरी जवळील समृद्धी महामार्गाच्या बोगद्यात अपघात झाला. यात चालकासह एका भाविकाचा मृत्यू झाला. तर आठ भाविक जखमी झाले.
रायगड जिल्ह्यातील कर्जत येथून एकाच कुटुंबातील २३ भाविक टेम्पो ट्रॅव्हलरने (एमएच ४६ एएच ०७६७) देव दर्शनासाठी १ नोव्हेंबरला मुंबई-नागपूर-समृद्धी महामार्गाने मध्यरात्री निघाले होते. कसारा ते इगतपुरी दरम्यान असलेल्या बोगद्यात सकाळी सातच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी बोगद्यातील डिव्हायडरवर धडकली.
यामुळे अपघात होऊन चालक दत्ता ढकवळ याचा जागीच मृत्यू झाला. इतर आठ भाविक जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या अपघातात जखमी भाविकांना इगतपुरी ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काही भाविक गंभीर जखमी असल्याने त्यांना धामणगावच्या एसएमबीटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान सुरेश गौरू लाड (६०, रा. दहिवली, ता. कर्जत, जि. रायगड) या भाविकाचा मृत्यू झाला. या अपघातात नंदकुमार मोरे (५४), आकाश गरुड (२५), शशीकांत लाड (६५) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. रेखा लाड, राजेश लाड, अशोक लाड (सर्व रा. दहिवली) हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावरही एसएमबीटी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.