

नाशिक : नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कुख्यात गँगस्टर अबू सालेम यास भेटण्यासाठी आलेल्या त्याच्या खास मैत्रिणीसह आणखी एकाची दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) चौकशी सुरू केली आहे. यात सालेमला भेटण्याचे कारण, उद्देश जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी गँगस्टर अबू सालेम हा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याला भेटण्यासाठी गुरुवारी (दि.१०) त्याची मैत्रीण कारागृहात आल्याचे दहशतवादविरोधी पथकास समजले. त्यामुळे पथकाने तातडीने त्याच्या मैत्रिणीसह एका व्यक्तीस चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी शहर पोलिसांसह राज्य गुप्तचर विभागाचेही पथक हजर होते. पथकाच्या सखोल चौकशीत ताब्यात घेतलेला दुसरा व्यक्ती हा दुसऱ्या कैद्यास भेटण्यासाठी आल्याचे समजते. मात्र, एटीएसने त्याचीही सखोल चौकशी केली. तसेच सालेमच्या मैत्रिणीकडे एटीएससह गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळपर्यंत चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. चौकशीत सालेमला भेटण्याचा हेतू, तिचा भूतकाळ, सालेमसोबत मैत्री कशी झाली यासह इतर प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न एटीएस करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.