Abu Salem | गँगस्टर अबु सालेमला नाशिकच्या कारागृहातून हलवलं

सशस्त्र बंदोबस्तात दिल्लीला नेणार, २ तारखेला सर्वोच्च न्यायालयात हजेरी
Abu Salem
गँगस्टर अबु सालेमला नाशिकच्या कारागृहातून हलवलंpudhari photo
Published on
Updated on

नाशिक : १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी कुख्यात गँगस्टर अबू सालेम अब्दुल कयुम अन्सारी याला येत्या २ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यासाठी नाशिक शहर पोलिसांचा ४४ अधिकारी-अंमलदारांचा सशस्त्र बंदोबस्त पुरविण्यात आला आहे. यासह वैद्यकीय पथक, रेल्वे पोलिस व स्थानिक पोलिसांचा स्वतंत्र बंदोबस्त कैदी पार्टीसाठी राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आज पहाटेच्या सुमारास त्याला नाशिक कारागृहातून हलवल्यात आले आहे.

सालेम याच्याविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), मुंबई पोलिस व दिल्ली पोलिसांत अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एका गुन्ह्यातील न्यायालयीन प्रक्रियेसाठी त्याला शुक्रवारी (दि. २) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हजर करण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव नाशिक शहर व कारागृह पोलिसांनी यासंदर्भात गोपनियता पाळल्याचे दिसून आले. सुरक्षिततेसाठी सालेमसोबत नाशिक पोलिस आयुक्तालयातील एक सहायक पोलिस आयुक्त, तीन पोलिस निरीक्षक, तीन सहायक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, पाच हवालदार आणि २७ अंमलदारांचा फौजफाटा दिल्लीला जाताना व तिकडून येताना राहणार आहे. त्यात दोन कॅमेरामन असतील. तसेच जलद प्रतिसाद पथकातील दहा सशस्त्र अंमलदारांचाही त्यात समावेश आहे. या पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पिस्तुलासह अत्याधुनिक शस्त्रसाठा पुरविण्यात आला आहे. पथकासोबत तीन वैद्यकीय अधिकारी ही दिल्लीला जाणार आहेत. तसेच प्रवासादरम्यान, स्थानिक पोलिसांचा फौजफाटा व रेल्वे पोलिस बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत.

जन्मठेपेची शिक्षा

सन २००५ मध्ये पोर्तुगालमधून आरोपी सालेम याचे प्रत्यार्पण करण्यात आले होते. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात त्याला टाडा न्यायालयाने सन २०१७ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

नाशिक रोड कारागृहात स्थलांतर

गँगस्टर अबू सालेम याला नवीन मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यास जुलै महिन्यात नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले. कारागृहातून स्थलांतराविरोधात सालेमने जीवास धोका असल्याचा दावा करत याचिका दाखल केली, मात्र विशेष न्यायालयाने ती फेटाळली होती. त्यावर सालेमने उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीपूर्वीच त्याला नाशिकरोड कारागृहामध्ये आणण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news