सिडको : परिसरातील शिवपुरी चौक येथे समाजकंटकाने सोमवारी (दि. 15) पहाटे रहिवासी महिलेची दुचाकी जाळली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडको परिसरातील शिवपुरी चौक येथे राहणाऱ्या सत्यभामा नागरे यांनी रात्री 10 च्या सुमारास घरी आल्यानंतर आपली ॲक्टिव्हा दुचाकी (एमएच १५, एचडब्ल्यू ४१४४) महादेव मंदिरासमोर उभी केली होती. सोमवारी पहाटे 4 च्या सुमारास समाजकंटकाने दुचाकी पेटवून दिली. दुचाकी पेटल्यानंतर परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी ती विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र उपयोग झाला नाही. गाडी संपूर्ण जळून खाक झाली होती. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. सत्यभामा नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात समाजकंटकावर गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.