

नाशिक : श्रुती मोईन
एकेकाळी सॅलॉन म्हणजे फक्त केस कापण्याचे ठिकाण. पण काळ बदलला तसं सॅलॉनचे रूपही बदलले. आता ते फक्त सौंदर्यसाधन नाही, तर व्यक्तिमत्त्व घडवण्याचे, आत्मविश्वास वाढवण्याचे ठिकाण बनले आहे. नाशिकमध्ये या नव्या सॅलॉन संस्कृतीचे तरुणाईमध्ये विशेष आकर्षण पाहायला मिळत आहे. आजचा सॅलॉन फक्त सौंदर्य देत नाही, तर आत्मविश्वास, व्यावसायिकता आणि व्यक्तिमत्त्वाची नवी ओळख निर्माण करतो.
मॉडर्न लूक, नवी हेअरस्टाइल, हेअर कलर किंवा स्वतःला अधिक आत्मविश्वासाने सादर करण्याची इच्छा, या सगळ्यांसाठी तरुण मुले-मुली आज सॅलॉनकडे वळत आहेत. शहरात तब्बल ५०० हून अधिक सॅलॉन आणि ब्युटी अकॅडमी कार्यरत असून, प्रत्येक गल्लीबोळात किमान एक सॅलॉन दिसतो. हेअर स्टायलिंग, फेस क्लीनअप, स्किन केअर, स्पा, मेकअप, नेल आर्ट आणि बियर्ड ग्रूमिंग अशा विविध सुविधा आज या सॅलॉनमध्ये उपलब्ध आहेत.
फेड, अंडरकट, बालयाज, हायलाइट्स, केरॅटिन आणि स्मूथनिंगसारख्या ट्रेंडी हेअरस्टाइल्समुळे तरुणाई आपली ओळख ठळकपणे निर्माण करत आहे. सौंदर्यतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सुंदर दिसणं म्हणजे फक्त बाह्य रूप नव्हे, तर तो आत्मविश्वासाचा भाग आहे. योग्य लूक आत्मविश्वास वाढवतो आणि व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी बनवतो.
सॅलॉन क्षेत्र आता करिअरच्या दृष्टीनेही आकर्षक ठरत आहे. अनेक नामांकित संस्थांतून हेअर कटिंग, मेकअप, स्किन केअर, नेल आर्ट, स्पा आणि ग्रूमिंगचे कोर्सेस चालतात. साधारणत: २५ हजारांपासून ते दीड लाखांपर्यंतच्या या कोर्सेसमुळे अनेक तरुण-तरुणींनी स्वतंत्र करिअरची दिशा मिळवली आहे.
सॅलॉन सेवांचे दर (रुपयांत)
पुरुष हेअरकट- १५० ते ४००
महिला हेअरकट - २५० ते १०००
केरेटिन / स्मूथनिंग - १५०० ते ८०००
बियर्ड ग्रूमिंग- ८० ते २५०
फेशियल / स्पा- ३०० ते १५००
आजचा ग्राहक फक्त सुंदर दिसण्यासाठी सॅलॉनमध्ये येत नाही, तर आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक बनवण्यासाठी येतो. तरुण पिढी नवनवीन हेअरस्टाईल्स, कलरिंग, स्किन केअर ट्रेंड्सबद्दल जागरूक आहे. नशिकसारख्या शहरात हा ट्रेंड झपाट्याने वाढतोय, आणि लोक आता ‘लूक’सोबत ‘कॉन्फिडन्स’लाही महत्त्व देत आहेत.
- अनमोल औसरकर, बिग बॉस युनिसेक्स सॅलॉन, नाशिक