

नाशिक : मान्सूनने दमदार सुरुवात केल्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी भागांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचा थेट परिणाम पाणीटॅंकरच्या संख्येवर झाला असून, केवळ पाच दिवसांत टॅंकरची संख्या ४९ ने घटली आहे.
१८ जूनअखेर ९४ टॅंकर नियमितपणे पाणीपुरवठा करत होते. मात्र २३ जूनपर्यंत ही संख्या घटून ४५ टॅंकरवर आली आहे. सध्या या टॅंकरद्वारे १७१ गाव- वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. मालेगाव, नांदगाव आणि पेठ तालुक्यांमध्ये सर्वाधिक टॅंकर धावत आहेत. विशेष बाब म्हणजे, सर्वप्रथम पाणीटॅंकर सुरू झालेले इगतपुरी आणि सुरगाणा हे तालुके आता टॅंकरमुक्त झाले आहेत.
एप्रिलपासून टॅंकरव्दारे पाणीपुरवठा सुरू झाला. सर्वात पहिला टॅंकर इगतपुरीत सुरू झाला होता. उन्हाच्या तीव्रतेमुळे टॅंकरची संख्याही वाढत गेली. यंदा कधी नव्हे तो संपूर्ण मे महिनाभर अवकाळी पाऊस झाला. त्यातून नदी-नाले वाहून जिल्ह्यातील जलाशयात काही प्रमाणात वाढ झाली. परिणामी, उन्हाळ्यात वाढलेल्या टॅंकरच्या फेर्या जूनच्या पहिल्या आठवड्यात काहीशा कमी झाल्या. शिवाय, मान्सून वेळेवर दाखल झाला. जिल्हाभर पावसाने दमदार हजेरी लावल्याने टॅंकरच्या फेऱ्यांना ओहोटी लागली. 18 जूनअखेर 98 गावे व 330 वाड्यांना 94 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने दुष्काळी भागाचे चित्र पालटू लागले आहे. परिणामी, 49 टॅंकर घटून, सोमवारअखेर 45 टॅंकर सुरू आहेत.
हंगामात सर्वात पहिला टँकर सुरू झालेला इगतपुरी तालुका आता टॅंकरमुक्त झाला आहे. नांदगावमध्ये तब्बल 18 तर, मालेगावमध्ये 3, सुरगाण्यात 4, येवल्यात 4, सिन्नर 2 टॅंकरची घट झाली आहे. धरण क्षेत्रात पावसाचे दमदार आगमन झाल्याने टॅंकरची संख्या आणखी घटण्याची शक्यता आहे.